News Flash

मतदानादाण!

बोरिवलीतही योगी नगर परिसरात, सेंट फ्रान्सिस शाळेतही अनेक मतदारांना त्यांची नावे सापडत नव्हती.

मतदानादाण!
निवडणूक केंद्रांवरील निवडणूक अधिकाऱ्यांकडे असलेली यादी आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडे असलेली यादी यांमध्ये तफावत होती.

याद्यांच्या गोंधळामुळे मतदारांच्या उत्साहावर विरजण

लोकशाही व्यवस्था सुदृढ करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावा, तुमचे मत महत्त्वाचे आहे, मतदान हे कर्तव्य आहे, असे आवाहन करून मतदारांमध्ये जागृती निर्माण करणाऱ्या निवडणूक यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे मंगळवारी हजारो मतदारांना आपल्या हक्कापासून वंचित राहावे लागले. लोकशाहीप्रति आपले कर्तव्य पार पडण्यासाठी मोठय़ा उत्साहाने सकाळपासून घराबाहेर पडलेल्या हजारो मतदारांची नावे मतदार याद्यांमध्येच नसल्याने जबरदस्त गोंधळ उडाला. मतदान केंद्रांवर इकडून तिकडे धावाधाव करण्यातच अनेक मतदारांचा वेळ वाया गेला. यंदा मुंबईतील मतदानाची टक्केवारी ५० टक्क्यांच्यावर गेली असली तरी, मतदार याद्यांमधील गोंधळामुळे मतदानास मुकलेल्या मतदारांचा विचार करता मतदानाची टक्केवारी यंदा दहा टक्क्यांनी कमी झाली, असा अंदाज आहे.

गत महापालिका निवडणुकीत जेमतेम ४५ टक्क्यांपर्यंत मतदानाची टक्केवारी गाठणाऱ्या मुंबईतील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोग, महापालिका आणि राजकीय पक्षांनी यंदा जोरदार मोहीम छेडली होती. मतदार जागृतीचे अनेक कार्यक्रमही घेण्यात आले. या साऱ्यामुळे यंदा मुंबईकर मोठय़ा प्रमाणात मतदानासाठी उतरले. परंतु निवडणूक यंत्रणेच्याच ढिसाळ कारभारामुळे हजारो मतदारांना आपल्या हक्कापासून वंचित राहावे लागले. दहिसर पश्चिमेकडील रुस्तुमजी कॉलनी परिसरात एकूण १ हजार २४९ मतदार आहेत. मात्र ऐन वेळी निवडणूक आयोगाकडून आलेल्या याद्यांमधून अनेक मतदारांची नावेच गायब असल्याचे आढळून आले. ‘मी अंधेरीहून फक्त मतदान करण्यासाठी इथे आले आहे. याआधी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी आणि माझ्या पतीने इथे येऊन मतदान केले होते, मात्र यावर्षी आमचे नावच यादीत नाही,’ अशी तक्रार रचना प्रभाकर यांनी केली.

बोरिवलीतही योगी नगर परिसरात, सेंट फ्रान्सिस शाळेतही अनेक मतदारांना त्यांची नावे   सापडत नव्हती. वोटर्स स्लिपचे गठ्ठे तिथे होते. पण त्या स्लिप लोकांपर्यंत पोहोचल्या नसल्याने नेमके कुठे मतदान करायचे, याबद्दलही त्यांच्या मनात गोंधळ होता. कित्येकांनी स्वत: वोटर्स स्लिप शोधून त्याप्रमाणे मतदार केंद्र गाठण्याचा प्रयत्न केला, मात्र अनेकांना निराश होऊन घरी परतावे लागले. कांदिवलीत चारकोप परिसरात सुस्मृती सोसायटी, उर्वी दर्शन सोसायटी आणि तोरणा सोसायटी अशा तीन सोसायटय़ा आहेत. तिथे दोनशे मतदारांपैकी फक्त पंधरा लोकांची नावे मतदार यादीत होती. भांडुपमधील प्रभाग क्रमांक ११५ मधील नेप्च्यून सोसायटीमध्ये २०-२५ मजल्यांच्या १२ इमारती आहेत. या १२ इमारतींमध्ये मिळून फक्त ५० ते ६० जणांचीच नावे मतदार यादीत सापडली. त्यामुळे येथे मोठय़ा प्रमाणात नाराजी होती.

धारावी आणि शीव कोळीवाडा परिसरात मतदार मोठय़ा रांगा लावून दुपारच्या वेळेतही उभे होते, पण येथेही मतदार यादीत अभूतपूर्व गोंधळ होता.

वांद्रे पश्चिम विभागातील पाली हिल, माऊंट मेरी यांसारख्या उच्चभ्रू सोसायटीमधील नागरिक मतदानासाठी उतरत नसल्याचे म्हटले जाते, मात्र यंदाच्या पालिकेच्या निवडणुकांसाठी या भागातील नागरिक मोठय़ा प्रमाणात मतदानासाठी उतरले असल्याचे पाहावयास मिळाले. मात्र यादीतील गोंधळामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या नाकीनऊ आले. यादी तपासणाऱ्या अधिकाऱ्यांच्या टेबलावर प्रचंड गर्दी होती. प्रत्येक मतदारासाठी ५० ते ६० पानांची यादी तपासावी लागत असल्यामुळे या अधिकाऱ्यांनी थेट मोबाइलवर अ‍ॅप्लिकेशनच्या साहाय्याने मतदार यादी शोधण्याचा प्रयत्न केला.

नवमतदारांची निराशा

दादरच्या ‘पॉप्युलर निकेतन’ इमारतीतील कोणाचेच नाव यादीत नव्हते. या इमारतीतील १४ मुले पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार होते. मात्र यादीत नाव नसल्याने त्यांचा उत्साहच ओसरला असून त्यांना आता आम्ही काय सांगणार, असा सवाल फलिका गोखले आणि दीपिका आंब्रे यांनी केला. मालवणी-मनोरी भागांतही अनेक मतदारांना यादीत नाव नसल्याने मतदानापासून वंचित रहावे लागले.

याद्यांमध्ये तफावत

निवडणूक केंद्रांवरील निवडणूक अधिकाऱ्यांकडे असलेली यादी आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडे असलेली यादी यांमध्ये तफावत होती. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या यादीत एखाद्याचा मतदार क्रमांक ६४२ असेल, तर अधिकाऱ्याच्या यादीत हा क्रमांक १२३२ वगैरे सापडत होता. त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला होता.

 कार्यकर्त्यांचा गोंधळ

वांद्रे पश्चिम भागातील बेहरामपाडा या भागातील प्रभाग ९६ येथील मतदार केंद्रात सायंकाळी ४च्या सुमारात मतदारांची गर्दी वाढली. त्यात २०० मीटर भागात वाहन लावण्यास मनाई करण्यात आली असतानाही येथे मतदान केंद्राच्या आवारात मोठय़ा संख्येने वाहनांची गर्दी होती. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांनी या भागात गोंधळ घातला. तर वांद्रे पश्चिम येथील ९५ प्रभागातील न्यू एमआयजी कॉलनीतील १३ व १४ इमारतीतील सुमारे १५०हून अधिक मतदारांचे नाव या प्रभागातून वगळून ९४ प्रभागातील यादीत आल्यामुळे इमारतीतील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

पोलीसही मतदानाला मुकले

यंदाच्याही निवडणुकीत मतदान करणे शक्य न झाल्याने पोलिसांनी खंत व्यक्त केली. सोमवार सकाळपासून मतदान केंद्रावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना आपल्या प्रभागात जाणे शक्य नव्हते. पोलिसांसाठी पोस्टल पद्धतीने मतदान करण्याची सोय करण्यात आली असली तरी ही प्रक्रिया खूप किचकट असून यासाठी वेळ नसल्याचे वांद्रे पश्चिम येथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2017 1:18 am

Web Title: bmc elections 2017 jumble in mumbai voters list mumbai voters mumbai voting percentage
Next Stories
1 काय ते करती खुणा, अन् काय त्यांच्या कल्पना!
2 लोकशाहीच्या उत्सवात मतदारांची जत्रा!
3 कुठे उत्साह, कुठे नाराजी!
Just Now!
X