29 November 2020

News Flash

महापौर निवडणुकीसाठी सेनेचे शक्तिप्रदर्शन

काँग्रेसचे ३१, राष्ट्रवादीचे ९, समाजवादीचे ६ आणि मनसेचे ७ असे विरोधकांचे एकूण ५३ नगरसेवक आहेत.

आजच्या निवडीसाठी उद्धव ठाकरे मिरवणुकीने पालिका मुख्यालयात

मुंबईच्या महापौर पदासाठी बुधवारी दुपारी १२ वाजता निवडणूक होत असून भाजपने माघार घेतल्यानंतर महापौर निवडणुकीत शिवसेनेच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. विजय पक्का समजून भाजपला शक्तिप्रदर्शन दाखविण्याच्या दृष्टीने ‘मातोश्री’ने तयारी केली आहे. पालिका मुख्यालयात येणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ शिवसैनिक आणि युवासैनिकांना पारंपरिक भगव्या वेशात गाडय़ांमधून येण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे. महापौर निवडणुकीनंतर शक्तिप्रदर्शन करीत हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी हुतात्मा स्मारक येथे जाण्याचा शिवसेना पक्षप्रमुखांचा मानस आहे.

महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक बुधवारी होत असून शिवसेनेने महापौर पदासाठी विश्वनाथ महाडेश्वर यांना, तर उपमहापौर पदासाठी हेमांगी वरळीकर यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने महापौर पदाच्या निवडणुकीत विठ्ठल लोकरे, तर उपमहापौर पदाच्या निवडणुकीत विनी डिसोझा यांना उतरविले आहे. काँग्रेसचे ३१, राष्ट्रवादीचे ९, समाजवादीचे ६ आणि मनसेचे ७ असे विरोधकांचे एकूण ५३ नगरसेवक आहेत.

समाजवादी पार्टीने आधीच आपण काँग्रेसबरोबर नसल्याचे जाहीर केले आहे. तर मनसेने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. ८४ नगरसेवकांचे संख्याबळ असलेल्या भाजपने महापौर पदासह पालिकेतील सर्वच निवडणुकांमधून माघार घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या ८४ आणि इतर ४ नगरसेवकांच्या पाठिंब्यावर महाडेश्वर आणि हेमांगी वरळीकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे. या निवडणुकीत आवाजी आणि हात उंचावून मतदान करण्यात येणार आहे.

शिवसैनिकांनी वाहनाद्वारे नियोजित ठिकाणी सज्ज राहावे आणि उद्धव ठाकरे यांचा ताफा पुढे सरकल्यानंतर त्यांच्या मागोमाग यावे, असे आदेश देण्यात आले आहेत. ही मिरवणूक पालिका मुख्यालयापर्यंत जाणार असून महापौर निवडणुकीनंतर महाडेश्वर, वरळीकर यांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी हुतात्मा चौकात रवाना होणार आहेत.

यापूर्वीही शिवसेनेचा महापौर मुंबई महापालिकेत निवडून आला आहे. परंतु शिवसेनेने असे शक्तिप्रदर्शन यापूर्वी कधीच केलेले नाही. भाजपबरोबरची युती तोडल्यानंतर महापौर निवडणुकीच्या निमित्ताने  शक्तिप्रदर्शन करण्याचा शिवसेनेचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

  • महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत होणारा विजय लक्षात घेत ‘मातोश्री’ने बुधवारी शक्तिप्रदर्शन करण्याचे मनसुबे आखले आहेत.
  • वरळी सागरीसेतू, जे. के. कपूर चौक, वरळी चौपाटी, कै. बिंदुमाधव ठाकरे चौक, मेला हॉटेल, लोटस सिनेमा, गणेश विसर्जन जट्टी यामार्गे उद्धव ठाकरे पालिका मुख्यालयाच्या दिशेने जाणार आहेत. वरळी, शिवडी, भायखळा येथे पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्याच्या स्वागतासाठी सकाळी १० वाजल्यापासून सज्ज राहण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2017 2:20 am

Web Title: bmc elections 2017 power display by shiv sena uddhav thackeray rally
Next Stories
1 महापौरपदाचे उमेदवार महाडेश्वर यांच्यावर नियमबाह्यरित्या घर घेतल्याचा आरोप
2 अधिवेशनात शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
3 वैधानिक, विशेष समित्यांच्या अध्यक्षपदासाठी चुरस
Just Now!
X