शहर कायापालटाची भाषा; मात्र उद्यान दुर्लक्षित

मुंबईचा कायापालट व विकासाची स्वप्ने दाखविणारी भरगच्च आश्वासने भाजप-शिवसेनेने दिलेली असली तरी दादरसारख्या मध्यवस्तीत ज्येष्ठ भाजप नेते ‘प्रमोद महाजन कला पार्क’ उभारूनही त्याची दुरवस्था आहे. देशातील सर्वोत्तम दर्जाचे उद्यान म्हणून विकसित करण्यासाठी महाजन यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या नावे उभारलेल्या या उद्यानाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही पक्षातील नेत्यांनी आणि खासदार पूनम महाजन यांनीही फारसे लक्ष पुरविलेले नाही. महाजन यांचे छायाचित्रही उद्यानातून हालविण्यात आले आहे. भाजपला ज्येष्ठ नेत्याच्या नावे असलेले उद्यान विकसित करता आलेले नाही. मात्र उद्यानाकडे लक्ष न देता शिवसेनेने महाजन यांचा अपमान केला असल्याचा आरोप मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला असून रेसकोर्सवर ‘थीम पार्क’ उभारण्याऐवजी आधी हे भव्य उद्यान ‘आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान’ म्हणून विकसित करावे, असे स्पष्ट केले आहे.

मलनिस्सारण केंद्राच्या दादरमधील सुमारे ११ एकर जागेवर बंगलोरमधील निसर्गोद्यानावर उद्यान विकसित करण्यासाठी पालिकेने पावले टाकली होती. महाजन यांच्या निधनानंतर  झाल्यावर तत्कालीन भाजप नगरसेवक चंद्रकांत पुगावकर यांनी या उद्यानाला ‘प्रमोद महाजन कला पार्क’ अशे नाव देण्याचा ठराव मांडला. त्याला सेनेनेही मंजुरी दिली होती. मात्र अनेक वर्षे पुरेसा निधी न मिळाल्याने उद्यानाचे काम रखडले. प्रीझम आकारात भव्य दालन उभारण्यात आले असून त्या जागेत दुर्मिळ वनस्पती, फुले यांची प्रदर्शने आयोजित करता येतील. स्लाईड शो, रंगीबेरंगी संगीत कारंजी उभारण्यासाठी काही कामे करण्यात आली आहेत.

या उद्यानाचे उद्घाटन महाजन यांच्या पुण्यतिथीला म्हणजे ३ मे २०१५ रोजी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाजन यांच्या पत्नी रेखा महाजन, खासदार पूनम महाजन यांनी या वेळी लावलेली रोपटी पाण्याअभावी व निगा राखली न गेल्याने काही दिवसांतच जळून गेली. आवाराची भिंत तोडून स्वच्छतागृहाचा वापर झोपडपट्टीतील नागरिक करीत होते, भिकारी व गर्दुल्ल्यांनी आणि बेकायदा बस व अन्य वाहने पार्क करण्यासाठी उद्यानाचा आसरा घेण्यात आला होता.

कोणाचेही लक्ष नसल्याने परिसरातील ‘दक्ष’ नागरिकांनी उद्यान किमान नीट रहावे यासाठी पाठपुरावा केला.  यासंदर्भात विचारता मी महापालिका आयुक्तांना उद्यानाच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालण्याची  विनंती केली होती, असे पूनम महाजन यांनी सांगितले.