News Flash

वाढीव टक्का कुणाच्या पारडय़ात?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सरासरी ४५ टक्के मतदान होते, असा आजवरचा अनुभव आहे.

वाढीव टक्का कुणाच्या पारडय़ात?
मुंबईत मतदान केंद्रांवर रांगा होत्या (छाया-अमित चक्रवर्ती)

मुंबई महापालिका निवडणुकीत दहा टक्के जादा मतदान; सगळेच आशावादी

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत गतवेळच्या तुलनेत मतदान दहा टक्क्यांनी वाढल्याने राजकीय नेतृत्वामध्ये चिंता असली तरी एकूण रागरंग लक्षात घेता भाजपला या वाढीव मतदानाचा फायदा होईल, असा एकूण अंदाज आहे. अर्थात, कोणत्या भागांमध्ये तसेच कोणत्या समाजाची वस्ती असलेल्या भागांमध्ये वाढीव मतदान झाले यावरही सारे अवलंबून आहे. वाढीव मतदानाचा फायदा होणार असला तरी भाजप सत्तेच्या जवळ जाईल का याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सरासरी ४५ टक्के मतदान होते, असा आजवरचा अनुभव आहे. १९९२ मध्ये ५० टक्क्यांच्या आसपास मतदान झाले होते, तेव्हा सत्ताबदल झाला होता. शिवसेनेपेक्षा तेव्हा काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या होत्या. जवळपास दहा टक्के मतदान वाढल्याने भाजपला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.या वेळी मतांची टक्केवारी वाढली असली तरी वगळलेली मते लक्षात घेता प्रत्यक्षात पाच ते सहा टक्केच मतदान वाढलेले आहे. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना अशीच लढाई होती. तिसरा प्रबळ पर्याय दिसत नव्हता. काँग्रेस पक्ष रिंगणात होता, पण या पक्षाचा तेवढा प्रभाव प्रचारात जाणवत नव्हता. म्हणजेच झालेले मतदान हे शिवसेना आणि भाजपमध्ये प्रामुख्याने विभागले गेले असणार. अर्थात, काँग्रेस, मनसे, एमआयएम, राष्ट्रवादी, अन्य छोटय़ा पक्षही या मतदानात वाटेकरी आहेतच.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढले होते. तेव्हा मुंबईत सरासरी ५५ टक्क्यांच्या आसपासच मतदान झाले होते. त्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले होते. हाच कल कायम राहील असे नाही, पण तेव्हाही वाढीव मतदान हे भाजपच्या पथ्यावर पडले होते. तेव्हा मोदी लाट होती. यंदा तशी कोणतीही लाट दिसत नव्हती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत गुजराती मतदारांचे मतदान चांगले झाले होते. या तुलनेत यंदा गुजराती मतदारांच्या मतदानाचे प्रमाण कमी आहे. बोरिवली, मालाड, विलेपार्ले, मुलुंड परिसरात गुजराती भाषकांचे मतदान सकाळी चांगले झाले. पण दक्षिण मुंबईत या तुलनेत कमी मतदान झाले. नोटाबंदीचा फटका व्यापाऱ्यांनाही बसला आहे. दक्षिण मुंबईतील व्यापारीबहुल भाग हा ‘हवाला’ म्हणून ओळखला जातो. या भागात लोकसभा आणि विधानसभेच्या तुलनेत कमी मतदान झाले याचा भाजपवर परिणाम करू शकतो.

जादा मतदानासाठी प्रयत्न

शिवसेनेने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. यामुळे शिवसैनिकांनी आपल्या हक्काचे मतदार जास्तीत जास्त बाहेर यावेत म्हणून प्रयत्न केले. शिवसेनेने सारी यंत्रणा कामाला लावली होती. याचा शिवसेनेला निश्चितच फायदा होऊ शकेल. गेल्या वेळी मनसेला मिळालेली मते यंदा शिवसेनेकडे वळल्यास त्याचा शिवसेनेला फायदा होऊ शकतो. मनसेची मते मोठय़ा प्रमाणावर शिवसेनेकडे हस्तांतरित झाली असल्यास त्याचा फायदा होऊन शिवसेनेच्या जागा वाढू शकतात. मराठी वस्त्यांमध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी शिवसेनेने कसून प्रयत्न केले. शिवसेनेच्या हक्क्याच्या मतांमध्ये विभाजन करण्याकरिता यंदा मनसे एवढा प्रभावी नव्हता व हा शिवसेनेसाठी फायदेशीर मुद्दा ठरला. शिवसेनेने जास्त मतदान व्हावे म्हणून केलेले प्रयत्नही वाढीव मतदान होण्यास कारणीभूत ठरल्याचे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे.

उत्तर भारतीय समाजाचे मतदान काही विभागांमध्ये चांगले झाले. उत्तर भारतीय मते भाजप, काँग्रेस, शिवसेनेत विभागली गेली असणार. उत्तर भारतीय मते एकगठ्ठा कोणत्याच पक्षाला मिळत नाहीत. मुस्लीम वस्त्यांमध्ये मतदानाला रांगा लागल्या होत्या. एमआयएम, समाजवादी पार्टी, काँग्रेसमध्ये ही मते विभागली जातील. मनसेने आपल्या प्रभाव क्षेत्रांमध्ये वर्चस्व कायम राखण्याकरिता ताकद लावली होती.

भाजपला सर्वाधिक जागा – मुख्यमंत्री

वाढीव मतदानाचा फायदा हा भाजपलाच होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी व्यक्त केला. मुंबईत भाजप हा क्र. १चा पक्ष असेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीच्या वेळी ५० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले असता भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले होते. महापालिकेत हाच कल राहील, असा अंदाज शेलार यांनी व्यक्त केला. वाढीव मतदान हे आम्हालाच फायदेशीर ठरेल, असा विश्वास शिवसेना आणि काँग्रेसनेही व्यक्त केला आहे. आम्ही केलेल्या कामांना मतदारांनी पावती दिल्याचा दावा शिवसेना नेते आमदार अनिल परब यांनी व्यक्त केला. तर काँग्रेसच्या पाठिंब्यात वाढ झाल्याचे निरुपम यांचे म्हणणे होते. शिवसेनेचेच सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील, असा दावा परब यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2017 3:24 am

Web Title: bmc elections 2017 voting percentage
Next Stories
1 जिल्हा परिषदांमध्ये ६८ टक्के मतदान
2 ‘एकखांबी तंबूं’ची कसोटी!
3 मतदानादाण!
Just Now!
X