News Flash

माजी मंत्र्याच्या पत्नीला खुल्या प्रभागातून उमेदवारी

महिला कार्यकर्त्यांमधील नाराजीचा फटका काँग्रेसला निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

काँग्रेसमधील महिला कार्यकर्त्यांमध्ये असंतोष

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत खुल्या प्रभागातून विद्यमान नगरसेविका अथवा महिला कार्यकर्त्यांना उमेदवारी न देण्याचे संकेत असल्याने यापूर्वी अनेकांना घरी बसावे लागले होते; मात्र या वेळी आपल्या पहिल्याच यादीत खुल्या प्रभागातून माजी मंत्री, नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या पत्नी व बहिणींना उमेदवारी देण्यात आल्या आहेत. विद्यमान नगरसेविकेला उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसच्या नगरसेविका व महिला कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून या दुजाभावामुळे प्रचारात न उतरण्याची भूमिका काही महिला कार्यकर्त्यांनी घेतली आहे. महिला कार्यकर्त्यांमधील नाराजीचा फटका काँग्रेसला निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महापालिकेमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण जाहीर झाल्यानंतर खुल्या प्रभागांमधून महिलांना उमेदवारी द्यायची नाही, असा निर्णय काँग्रेसने पूर्वी घेतला होता. त्यामुळे विद्यमान नगरसेविकांचा प्रभाग खुला झाल्यानंतर त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. या वेळी तशी घोषणा झालेली नाही. मात्र पूर्वीचे संकेत लक्षात घेत अनेक आजी-माजी नगरसेविका, महिला कार्यकर्त्यांनी खुल्या प्रभागांमधून उमेदवारी मिळविण्यासाठी अर्जच केले नाहीत. काँग्रेसने मंगळवारी ११५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात १६ नगरसेविकांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यापैकी १५ नगरसेविकांना महिलांसाठी आरक्षित असलेल्या प्रभागांमधून उमेदवारी देण्यात आली आहे. केवळ एकाच नगरसेविकेला खुल्या प्रभागातून उमेदवारी देण्यात आली असून या दुजाभावामुळे महिला कार्यकर्त्यां संतापल्या आहेत.

आरक्षणामध्ये खुल्या झालेल्या प्रभाग क्रमांक १५० मधून माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या पत्नी आणि विद्यमान नगरसेविका संगीता हांडोरे यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र हा प्रभाग खुला असतानाही पहिल्याच यादीत संगीता हांडोरे यांना तेथूनच उमेदवारी जाहीर करण्यात आली.

इतरांवर अन्याय का

केवळ एकाच विद्यमान नगरसेविकेला खुल्या प्रभागातून उमेदवारी का देण्यात आली, असा सवाल महिला कार्यकर्त्यां करू लागल्या आहेत. गेली पाच वर्षे काम केल्यानंतर आरक्षणात खुल्या झालेल्या प्रभागात नगरसेविकांना उमेदवारी द्यायला हवी होती. पक्षाने घेतलेल्या निर्णयानुसार पूर्वी अनेक नगरसेविकांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. आता जर एका नगरसेविकेला खुल्या प्रभागातून उमेदवारी देण्यात आली आहे, मग इतरांवर का अन्याय केला जात आहे, असा सवाल नगरसेविका आणि महिला कार्यकर्त्यां करू लागल्या आहेत. यामुळे महिला कार्यकर्त्यांमध्ये असंतोष असून त्याचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.

महिला उमेदवार

रश्मी यशवंत मेस्त्री (प्रभाग क्रमांक १४), नगरसेवक शिवा शेट्टी यांची बहीण विजयालक्ष्मी नारायण शेट्टी (१८), भूमी मानकर (२५), विवेकानंद जाजू यांची पत्नी स्नेहल जाजू, काँग्रेस पदाधिकाऱ्याची बहीण देवता पाटील (१०५), ब्लॉक अध्यक्षाची वहिनी असलेल्या वैशाली कांबळे, संगीता वर्पे (१२८), ब्लॉक अध्यक्षांची पत्नी शबनम खान (१३८), शकीला अब्दुल कादर शेख (१८७), ब्लॉक अध्यक्षांची पत्नी हर्षांली कांबळे (१९२), शुभांगी भुजबळ (२०७).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 2:40 am

Web Title: candidate issue in congress
Next Stories
1 पालिकेच्या पारदर्शकतेला केंद्राची पावती
2 उमेदवारी मिळाल्यास विभागप्रमुखांना पदावरून हटवणार
3 मुंबई वेगळी करण्याचा डाव असेल तर पाय छाटेन; राज ठाकरेंचा इशारा
Just Now!
X