मुंबई महापालिकेसाठी ११५ उमेदवार जाहीर; जुन्यांना संधी

महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेची सारी मदार ही मराठी मतांवर असताना काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या ११५ उमेदवारांच्या यादीत मराठी भाषकांना संधी देण्यात आली आहे. तसेच निवडणुका जिंकण्याच्या उद्देशाने अधिकाधिक जुन्या चेहऱ्यांना पुन्हा सामावून घेण्यात आले आहे. १९ विद्यमान तर १८ माजी नगरसेवकांचा यादीत समावेश आहे. तसेच नेतेमंडळींच्या नातेवाईकांना स्थान मिळाले आहे.

मुंबई काँग्रेसमध्ये संजय निरुपम व गुरुदास कामत यांच्यात निर्माण झालेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर उमेदवारी देताना त्याचे पडसाद उमटतील, अशी शक्यता होती. पण सर्व नेत्यांच्या समर्थकांना सामावून घेण्याचा प्रयत्न निरुपम यांनी केला आहे. कामत समर्थकांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. २२७ पैकी वाद नसलेल्या प्रभागांमधील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. नारायण राणे समर्थकांनाही संधी देण्यात आली आहे.

निरुपम यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत नगरसेवक भोमसिंग राठोड, माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.  दोनच दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले मालाडमधील माजी नगरसेवक परविंदरसिंग भामरा हे पुन्हा स्वगृही परतले.

मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शीतल म्हात्रे (प्रभाग क्र. १), गीता यादव (३१), पारुल मेहता (३५), विन्नी डिसोझा (८३), प्रियतमा सावंत (९३), संगीता हांडोरे (१५०), ललिता यादव (१७५), नयना सेठ (१७७), गंगा माने(१८३), सुषमा विनोद शेखर (२२६) आदींचा समावेश आहे. तसेच पालिकेतील विरोधी प्रवीण छेडा (१३२), आसिफ झकेरिया (१०१) यांच्यासह तीन नगरसेवकांना उमेदवारी देण्यात आली आहे.  नगरसेवक सुरेश कोपरकर यांच्या पत्नी आशा कोपरकर (११०), नगरसेवक सुनील मोरे यांच्या पत्नी सुप्रिया मोरे (२०१) तसेच  ज्ञानराज निकम, दिवंगत माजी नगरसेवक राजेंद्र चौबे यांचे पुत्र अभयकुमार चौबे, (३) यांची कन्या निकिता निकम (२२३) यांनाही काँग्रेसने उमेदवारी देऊन पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या पत्नीलाही उमेदवारी जाहीर झाली आहे.  यादीमध्ये ६४ मराठी भाषक, १८ उत्तर भारतीय, १२ मुस्लीम, ११ गुजराथी, तीन ख्रिश्चन, ५ दाक्षिणात्य, एक पंजाबी आणि एक सिंधी उमेदवाराचा समावेश आहे.