25 February 2020

News Flash

वॉर रुम : समाजमाध्यमांवरची काँग्रेसी खेळी

पक्षातर्फे इंस्टाग्रामचाही वापर करण्यात आला आहे.

 

अरे निरूपम साहब का व्हिडीओ आया है.. फेसबूक, ट्विटर पे अपलोड कर देना.. सब व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप मे भेज देना.. अशा चर्चा करत तीन ते चार लोक पोस्ट अद्ययावत करत असतात.. काही प्रमुख मंडळी मार्गदर्शनासाठी बसलेले असतात. हे वातावरण आहे काँग्रसेच्या मुंबई कार्यालयातील एका कोपऱ्यातील खोलीत इंटरनेट आणि संगणकाने सुसज्ज अशा वॉररूमचे.  समोरचा पक्ष किती जोरात प्रचार करतोय.. आपल्या पक्षाच्या विरोधात किती बोलतोय.. या सर्व माध्यमातून टीकाकारांकडे लक्ष न देता आपण ठरविलेले एक कलमी कार्यक्रम राबवत त्याच मार्गाने पुढे जाण्याची काँग्रेसी खेळी समाजमाध्यमांवरही दिसते.

मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळय़ा समोर ठेवून तब्बल दीड वर्ष आधीपासून पक्षाने समाज माध्यमाचा प्रभावी वापर करण्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली. लोकांपर्यंत पोहचण्यासाठी आवश्यक त्या सर्व पर्यायांचा वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा त्यांचा मानस आहे.

काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजर निरूपम हे स्वत: समाज माध्यमांवर सतत पोस्ट करत असल्यामुळे पक्षाच्या समाज माध्यम कक्षाला सदैव दक्ष राहावे लागते. त्यांनी केलेल्या पोटस्ट रीट्विट करणे, फेसबूक आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या मामध्यमातून लोकांपर्यंत पोहचवण्याची महत्त्वाची भूमिका हा विभाग बजावत असतो. सत्ताधारी पक्षाने मुंबईकरांची फसवणूक करत कशी दिशाभूल केली आहे असे सांगणारे ग्राफिक्स तयार करून ते समाज माध्यमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम या कक्षामार्फत केले जाते. यासाठी पक्षाने भक्कम पाया रचला आहे. पक्षाने ४५० प्रशिक्षित समाज माध्यम कार्यकर्त्यांची निवड केली आहे.हे कार्यकर्ते विविध विभागांमध्ये काम करतात. हे कार्यकर्ते तेथील माहिती मुख्य कक्षापर्यंत पोहचवण्याचे काम करतात याचबरोबर कक्षा कडून आलेली माहिती विभागातील लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत असतात. याचबरोबर पाच ते दहा हजार व्हॉट्सअ‍ॅप कार्यकर्ता असून त्यांच्या माध्यमातून पक्षाचे ध्येय धोरणे, जाहिरनामा, पक्ष श्रेष्ठींची भाषणे आदी गोष्टी पोहचविल्या जातात. पक्षाच्या मुख्य समाज माध्यम कक्षातून पाठवलेली माहिती अर्धा तासाच्या आत ५० ते ६० हजार नागरिकांपर्यंत पोहचवण्याचे काम व्हॉट्सअ‍ॅप कार्यकर्ता करत असतो.

तर फेसबूक आणि ट्विटरवरील माहितीही सामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी हे कार्यकर्ते काम करत असतात. पक्षातर्फे इंस्टाग्रामचाही वापर करण्यात आला आहे.

या मार्फत विविध छायाचित्र शेअर केले जात असल्याचे कक्षाचे हिरेन जोशी यांनी सांगितले. या विभागात काँग्रेसचे मनमोहन सिंग पाहुजा आणि शिवकुमार लाड हेही मुख्य भूमिका बजावत आहेत. याचबरोबर यंदा प्रथमच मुंबईतील बहुभाषकांना आकर्षित करण्यासाठी पक्षातर्फे हिंदी, मराठी, इंग्रजी याचबरोबर आता गुजराती मध्येही प्रचार माहिती राबविली जाणार आहे.

पक्षातर्फे लोकांकडून मिस्डकॉल देण्यासाठी एक क्रमांक सुरू केला होता. या क्रमांकावर आत्तापर्यंत तब्बल एक ते सव्वा लाख लोकांनी मिस्ड कॉल दिला आहे. यातून जमा झालेल्या क्रमांकांवरही संदेश पाठविण्याचे काम पक्षाच्या समाज माध्यम कक्षातर्फे केले जाते.

ट्विटर ट्रेंड

केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील कार्यकर्त्यांना आव्हान करून मुंबई काँग्रेसशी संबंधित तयार करण्यात आलेला ट्विटर ट्रेंड जास्त वेळ पहिल्या क्रमांकावर ठेवण्याचा प्रयत्न पक्षातर्फे केला जातो. यासाठी देशभरातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधून ट्रेंड जास्त वेळ ठेवण्याचा प्रयत्न असल्याचेही जोशी यांनी नमूद केले. आत्तापर्यंत अनेक ट्रेंड्स दोन ते तीन तास कायम राहिल्याचेही ते म्हणाले.

लाइव्ह ब्रॉडकास्ट

पक्षाच्या विविध सभा, रोड शो याचे लाइव्ह ब्रॉडकास्टिंग केले जाणार आहे. यासाठी सुसज्य यंत्रणा उपलब्ध करुन देण्यात आली असून फेसबूकच्या माध्यामातून लाइव्ह ब्रॉडकास्टिंग केले जाणर असून लाइव्ह ट्विटही केले जाणार आहे. याचबरोबर त्याच्या क्लिप्स व्हॉट्सअ‍ॅपवरही व्हायरल केल्या जाणार असल्याचे जोशी यांनी नमूद केले.

लाइव्ह चॅट

तरुणांना आकर्षित करण्यासाठी पक्षाच्या तरुण नेत्यांचे लाइव्ह चॅट केले जाणार आहे. यासाठीही वेगळे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. आत्तापर्यंत होणाऱ्या लाइव्ह चॅटमध्ये लेखी उत्तरे द्यावी लागतात. पण तसे करण्यात बराच वेळ जातो. हे टाळण्यासाठी यावेळेस व्हिडीओ चॅटचा वापर करण्यात येणार असून मतदारांना थेट उत्तरे देण्यात येणार असल्याचेही जोशी यांनी नमूद केले.

First Published on February 11, 2017 2:48 am

Web Title: congress war room to handle social media
Next Stories
1 शिवसेनेचे मराठी प्रेम भाषणापुरतेच!
2 मुंबईच्या विकासावरून मुख्यमंत्र्यांशी जुगलबंदी करण्याची तयारी-उद्धव
3 भ्रष्टाचाराला अधिकारीच जबाबदार!
Just Now!
X