21 September 2020

News Flash

नगरसेवकांवर दुप्पट लक्ष्मीकृपा

बहुतांश उमेदवारांची मालमत्ता ही काही लाख ते कोटी रुपयांमध्ये आहे.

  मतदारांना निर्भीडपणे मतदान करण्यासाठी प्रोत्साहन देणारे फलक शहरात ठिकठिकाणी लागले आहेत. (छायाचित्र : संतोष परब) 

बडय़ा नगरसेवकांच्या उत्पन्नात पाच वर्षांत दुपटीने वाढ

‘राजकारणात काही खरे नसते’, ‘होत्याचे नव्हते होते’ असे म्हटले जात असले तरी, राजकीय क्षेत्रातील मंडळींच्या संपत्तीकडे पाहिल्यावर हा समज पूर्णपणे खोटा ठरतो. पुन्हा एकदा महानगरपालिकेत प्रवेश करण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या अनेक बडय़ा उमेदवारांच्या घरात नगरसेवकपदाबरोबरच लक्ष्मीही गेल्या पाच वर्षांत सोन्याची पावले घेऊन आली आहे. कारण, यापैकी अनेक उमेदवारांचे उत्पन्न या पाच वर्षांत जवळपास दुपटीने वाढले आहे.

महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांनी दाखल केलेली प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाच्या पंचायत इलेक्शन या संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहेत. वय, शिक्षण, गुन्हे, वार्षिक उत्पन्न, स्थावर व जंगम मालमत्ता, एकूण उत्पन्न आणि आधीच्या निवडणुकीच्या वेळच्या मालमत्तेची माहिती या प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे. बहुतांश उमेदवारांची मालमत्ता ही काही लाख ते कोटी रुपयांमध्ये आहे.

महानगरपालिकेत उच्चपदांवर राहिलेल्या नगरसेवकांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत दुपटीने वाढ झाल्याचे दिसते आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे, महापौर स्नेहल आंबेकर, सपाचे गटनेता रईस शेख, भाजप गटनेता मनोज कोटक आणि विरोधी पक्षनेता प्रवीण छेडा पुन्हा एकदा निवडणूक लढवीत असून पाच वर्षांपूर्वीच्या त्यांच्या उत्पन्नात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. तर सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांची संपत्ती पाचपटीने वाढली आहे. या सर्वानी व्यवसाय म्हणून व्यापार करीत असल्याची नोंद केली आहे.

अवघ्या ६९० कोटींची संपत्ती

प्रभाग क्रमांक १३२ मधून भाजपकडून निवडणूक लढवीत असलेल्या ४७ वर्षांच्या विकासक पराग शाह यांनी ६८९ कोटी ९५ लाख रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. यात १९ कोटी रुपयांची स्थावर तर ६७० कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे सांगितले आहे. जंगम मालमत्तेपैकी ५०० कोटी रुपयांहून अधिक हे कंपनीचे समभाग व बंधपत्राच्या स्वरूपात आहेत. याशिवाय मुंबईतील तीन घरे त्यांच्या व दोन घरे पत्नीच्या नावावर आहेत. शहरात नगरसेवकपदाची निवडणूक लढवणाऱ्या श्रीमंत उमेदवारांपैकी पराग शाह आहेत. त्यांच्यासमोर पाच वर्षांपूर्वी भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले प्रवीण छेडा यांचे आव्हान आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 2:25 am

Web Title: corporators money bmc
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांकडून मुंबई, पाटण्याचाही अपमान
2 मुंबईकरांचे गोमटे व्हावे..
3 निव्वळ घोषणा नकोत!
Just Now!
X