देवेंद्र फडणवीस यांचा टोला; चुकीच्या धोरणांमुळे मराठी माणूस मुंबईबाहेर

शिवसेनेचे मराठी माणसाबद्दलचे प्रेम भाषणापुरतेच असून खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, असा सणसणीत टोला लगावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘शिवसेनेच्या चुकीच्या धोरणांमुळे मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला असल्याचे टीकास्त्र सोडले. शिवसेनेच्या भ्रष्टाचारामुळे मुंबईला बुडविले असल्याचा आरोप करीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘कंत्राटदारांना मलिदा खायला मिळावा, यासाठी रस्त्याची कामे दरवर्षी काढली जातात आणि नाल्यातील गाळच न काढता मुंबईकरांच्या घामाचे कोटय़वधी रुपये कंत्राटदारांच्या घशात घातले जातात,’ अशी शिवसेनेच्या कारभारावर टीकेची झोड उठविली.
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रंग भरला जात असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकूरद्वार-गिरगावमध्ये शिवसेनेवर शरसंधान केले. महापालिकेतील सत्ता २० वर्षांहून अधिक काळ हाती असताना शहराचा विकास आराखडा आणि विकाय नियंत्रण नियमावलीत योग्य तरतुदी करून त्या सुयोग्य नियोजनातून राबविल्या असत्या, तर गिरगावसारख्या मराठी वस्त्यांमधील मराठी माणून मुंबईबाहेर दूरवर फेकला गेला नसता. जुन्या चाळी, इमारती मोडकळीस आल्या नसत्या. त्याच ठिकाणी पुनर्विकास करण्याच्या तरतुदी करणे आवश्यक होते. पण त्या केल्या गेल्या नाहीत आणि मराठी माणसाला वाईट अवस्थेत रहावे लागत आहे. गिरगावसारख्या विभागांमध्ये पहाटे तासभर पाणी दिले जात असल्याने लोकांचे मात्र हाल होत आहेत. त्यामुळे भाजपला एकहाती सत्ता दिल्यास त्यांना पुरेशा सुविधा पुरविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
अनेक महापालिकांच्या अर्थसंकल्पांपेक्षा अधिक म्हणजे सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचा निधी रस्त्यांच्या कामांवर खर्च होतो. कंत्राटदारांना मलिदा खायला मिळावा, यासाठी त्याच रस्त्यांची कामे दरवर्षी काढली जातात. नाल्यांमधून गाळ काढलाच जात नाही आणि तो दूरवर टाकल्याच्या वाहनांच्या खोटय़ा नोंदी करून करोडो रुपये खाल्ले जातात. अगदी दुचाकी, रिक्षा व कोणत्याही वाहनांचे क्रमांक देऊन एका वाहनाच्या अनेक फेऱ्या दाखविल्या जातात. ते काय ‘रजनीकांत’ आहेत का, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.