राज्यातील २७ महानगरपालिकांच्या महापौर पदाची आरक्षण सोडत उद्या (३ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता नगरविकास विभागाकडून मंत्रालयात काढली जाणार आहे. मुंबईचे महापौरपदाच्या आरक्षण सोडतीकडे राज्याचे लक्ष वेधले आहे. यंदा मुंबईचे महापौर ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असण्याची शक्यता आहे.

प्रभागाच्या आरक्षण लॉटरीनंतर महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हे लॉटरीच ठरवणार आहे. महापौरपदाचे आरक्षण काढण्याची पध्दत १९९९ पासून सुरू झाली. तेव्हापासूनच महापौरपद हे अडीच वर्षाचे करण्यात आले. १९९९ मध्ये हे पद लॉटरीत ओबीसींसाठी राखीव झाल्यामुळे आगरी समाजातील हरेश्‍वर पाटील यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडली. यानंतर २००२ मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर महापौर पद अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यामुळे लोअर परळचे नगरसेवक महादेव देवळे यांना महापौर होण्याची संधी मिळाली.

यानंतरच्या पुढील अडीच वर्षात महापौर पद खुल्या प्रवर्गात गेल्यामुळे विक्रोळीचे नगरसेवक दत्ता दळवी यांना महापौर पदाची लॉटरी लागली. २००७ च्या महापालिका निवडणुकीत पुन्हा महापौरपद ओबीसी महिलेसाठी राखीव झाल्यामुळे दहिसरच्या शिवसेना नगरसेविका डॉ. शुभा राऊळ या महापौर झाल्या होत्या. त्यानंतर पुढील अडीच वर्ष महापौर पदाच्या आरक्षण खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे शिवसेनेच्या श्रध्दा जाधव महापौर झाल्या.

२०१२ च्या निवडणुकीनंतर महापौरपद खुल्या प्रवर्गात गेल्यामुळे विद्यमान आमदार सुनील प्रभू महापौर बनले. पण पुढील अडीच वर्षासाठी महापौर पद अनुसूचित जातीमधील महिलांसाठी राखीव झाल्यामुळे स्नेहल आंबेकरांना महापौरपदाची लॉटरी लागली. स्नेहल आंबेकर लोअर परळमधून पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. आता पुन्हा महापौर पदाची लॉटरी उद्या काढली जाणार आहे.