‘टेक्नोसॅव्ही’ नेत्यांसोबत नवख्या उमेदवारांचाही ‘स्मार्ट’ प्रचार

फेसबुक, व्हॉट्सअप आदी समाजमाध्यमांतून मतदारराजासोबत संवादाचे पूल बांधणे कसे प्रभावी ठरते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये दाखवून दिल्यानंतर आता फेब्रुवारी, २०१७चा मुंबई महापालिकेचा महासंग्रामही समाजमाध्यमांतून खेळण्यासाठी उमेदवारांनी ‘स्मार्ट’ अस्त्रे परजण्यास सुरुवात केली आहे. यात अर्थातच ‘टेक्नोसॅव्ही’ असलेल्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे, परंतु समाजमाध्यमांवर फारसे ‘अ‍ॅक्टिव्ह’ नसलेल्या आणि तंत्रज्ञानाच्या वापरात फारसे ‘स्मार्ट’ नसलेल्या उमेदवारांना व्यावसायिकांची मदत घ्यावी लागते आहे. त्यासाठी उमेदवारांचे व्हॉट्स ग्रुप, ट्विटर हँडल, फेसबुक पेज वापरण्यापासून ते ‘मिस्ड कॉल’ने मतदारांचा ‘डेटाबेस’ जमा करून देणाऱ्या अनेक छोटय़ा-मोठय़ा खासगी कंपन्या सध्या आपले ‘पॅकेज’ घेऊन उमेदवारांच्या कार्यालयांच्या पायऱ्या झिजवीत आहेत.

चौकाचौकांत बैठका, सभा, घरोघरी जाऊन मतदाराची भेट घेणे हाच २०१२पर्यंत महापालिका निवडणुकांमधील प्रचाराचा बाज होता. मात्र अडीच वर्षांपूर्वी लोकसभा व त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने सामाजिक माध्यमांचा वापर करण्याचे प्रभावी तंत्र वापरले. आता या तंत्राचे माहात्म्य सर्वच पक्षांनी जाणले असून फेसबुक, ट्विटर अशा ऑनलाइन सार्वजनिक प्रचारसभांसोबत व्हॉट्सअ‍ॅप, अ‍ॅप्स यामधून मतदारांशी वैयक्तिक पातळीवर संवाद साधण्याचे स्वस्त व मस्त ‘फंडे’ उपयोगात आणले जात आहेत.

पक्षांचा एकीकडे प्रचार सुरू असतानाच वैयक्तिक पातळीवरही उमेदवारांच्या प्रचारमोहिमा सुरू झाल्या आहेत. टेकसॅव्ही असलेल्या नव्या पिढीतील उमेदवारांनी गेल्या वर्ष-दोन वर्षांत वेगवेगळ्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून मतदारांना जोडून घेतले. मात्र तंत्रज्ञानाचा तोंडवळा फारसा माहिती नसलेल्या उमेदवारांना फेसबुक, ट्विटर सांभाळण्यासाठी व्यावसायिक मदतही घेतली आहे. ट्विटर व फेसबुकवर एकीकडे प्रचार सुरू असतानाच मतदारांच्या मोबाइल क्रमांकावर वैयक्तिक संदेश पाठवण्याचे काम सुरू आहे. मतदारांचा व समर्थकांचा डेटाबेस जमवण्यासाठी काही उमेदवारांनी ‘मिस्ड कॉल’ देण्याचा पर्यायही अवलंबला आहे. त्यामुळे येत असलेल्या क्रमांकावर पक्षांची व स्वत:च्या कामाची माहिती देणारे संदेश पाठवले जात आहेत.

राजकीय पक्षांची स्मार्टमोहीम

  • पालिका निवडणुका जाहीर होण्याआधीपासूनच सर्वच सामाजिक माध्यमांवर ‘डीडयूनो’च्या माध्यमातून शिवसेना झळकू लागली होती.
  • मनसेने राज ठाकरे यांच्या हस्ते दादर येथे वॉररूमची स्थापना केली. ‘अजून वेळ गेलेली नाही,’ अशा ‘कॅचलाइन’ने मनसेने दादरसह मुंबईवर लक्ष केंद्रित केले.
  • राष्ट्रवादीने सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ऑनलाइन प्रचार सुरू केला.
  • काँग्रेसही यात मागे नाही. सेनेच्या ‘डीड यू नो’ला उत्तर देताना त्यांचाच हॅशटॅग वापरल्याने काँग्रेसही ट्रेण्डमध्ये आली.
  • भाजपने तर जिल्हा परिषदांच्या निवडणुका व पालिका निवडणुका लक्षात घेऊन ऑक्टोबरमध्येच वॉररूम सुरू केला.