लादी बसविणे, पाणीपुरवठा, मलनिसारण, कचरा व्यवस्थापन, रस्तेसुधारणा, नालेसफाई यासारख्या समस्या सोडवणे हे खरेतर नगरसेवकांचे काम. परंतु, यंदाच्या निवडणुकीत याही पुढे जात काही नगरसेवक व उत्साही उमेदवारांनी सीसीटीव्ही कॅमेरे, वायफाय, सायकल ट्रॅक, सेल्फी पॉइंट, ज्येष्ठांसाठी ‘जिम’ अशा ‘हायफाय’ प्रलोभनांनी मतदारांची मने जिंकण्याचा सपाटा लावला आहे.

रस्ते, दिवाबत्ती, पाणी हे पालिकेच्या कर्तव्यांमध्ये येते. यातील बरीचशी कामे प्रशासकीय स्तरावर होत असल्याने दरवर्षी मिळत असलेला ६० लाख रुपयांचा नगरसेवक निधी व ४० लाख रुपयांचा विकास निधी यातून नगरसेवक गरीब वस्तीत गटारे बांधणे, गृहनिर्माण संस्थांमध्ये लाद्या टाकणे, सार्वजनिक शौचालयाला रंगरंगोटी करून देणे, सत्यनारायण पूजा, गणेशोत्सवाचे आयोजन अशा प्रकारची कामे करतात. वर्षांनुवर्षे निवडणुका या कामांवर लढल्या आणिजिंकल्या गेल्या आहेत. मात्र आता मध्यमवर्गीयांच्या बदलत्या आशा-आकांक्षांनुसार नगरसेवकांनीही कामाचे स्वरूप बदलण्यास सुरुवात केली आहे. येत्या निवडणुकांमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी अशा कामांना प्राधान्याने समोर ठेवले जात आहे.

BJP manifesto 2024 Sankalp Patra continuity amid change
भाजपाच्या जाहीरनाम्यात नवीन काय? कुठले मुद्दे वगळले? कशाबाबत मौन?
chagan bhujbal
महायुतीच्या बैठकीत नाशिकचा तिढा सुटेल; छगन भुजबळ यांना विश्वास
loksatta viva Artificial Intelligence Lok Sabha Election social media
AIच्या गावात!
Do not participate in party campaign without consent confusion due Vanchits new Instructions
… तोपर्यंत मित्र पक्षाच्या प्रचारात सहभागी होऊ नका, वंचितच्या फतव्याने संभ्रम

मध्यमवर्गीय व तरुणांमध्ये ‘सेल्फी’विषयी असलेले आकर्षण लक्षात घेऊन मुंबईत सर्वात पहिला सेल्फी पॉइंट मनसेचे गटनेता संदीप देशपांडे यांनी तयार केला. शिवाजी पार्क परिसरात मृत झालेल्या झाडांना रंगरंगोटी करून तसेच छत्र्यांची सजावट केलेला हा पॉइंट भलताच लोकप्रिय झाला होता. त्यानंतर इतर नगरसेवकांनीही त्यांच्या विभागात अशा प्रकारे काम करण्याचा प्रयत्न केला.

‘या शिवाय प्रभादेवी, दादर, शिवाजी पार्क परिसरातच सामाजिक उत्तरदायित्व निधीतून रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्यांची जोडणी नजिकच्या पोलिस ठाण्यात दिली आहे. या कामासाठी नगरसेवक निधी खर्च करण्याची तरतूद नसल्याने सीसीआरसाठी प्रयत्न करण्यात आले,’ असे प्रभादेवीतील नगरसेवक संतोष धुरी म्हणाले. नगरसेवकासह उमेदवारांनीही नव्या क्लृप्त्या योजण्यास सुरुवात केली आहे. भांडूप येथून निवडणूक लढवण्यास उत्सुक असलेले जितेंद्र घाडीगावकर यांनी वॉर्ड क्रमांक ११५ मध्ये मोफत वायफाय सेवा दिली आहे. या परिसरात इंटरनेटची सुविधाही नीट मिळत नाही. त्याचवेळी तरूण मुले तसेच स्त्रियांना इंटरनेटची गरज असते, हे ओळखून दहा दिवसांपूर्वी या भागात मोफत वायफाय सुरू करण्यात आले, असे जितेंद्र घाडीगावकर म्हणाले.

सायकलसाठी विशेष मार्गिका

वांद्रे पश्चिम येथील उच्चभ्रू वस्तीतील नगरसेवक असिफ झकेरिया यांनी सायकल ट्रॅक बांधण्यासाठी परवानगी घेतली आहे. रस्ता हा केवळ चारचाकीसाठी नाही तर सायकलसाठीही असतो. त्यासाठी त्यांना कार्टर रोडवर सायकलसाठी विशेष मार्गिका करण्यासाठी परवानगी मिळाली असून येथे सायकल पार्किंगसाठीही व्यवस्था केली जाणार आहे. जेणे करून मुलांना व मोठय़ांनाही या रस्त्यांवरून सायकल चालवण्याचा आनंद मिळू शकेल, असे झकेरिया म्हणाले. व्यायामाबद्दल वाढती जागरूकता व मतदारांचा वयोगट लक्षात घेऊन कुलाबा येथील नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी गेल्याच महिन्यात बीपीटी उद्यानात ज्येष्ठांसाठी जिम सुरू केले आहे. चीनमध्ये ज्येष्ठांसाठी जिम ठेवणे बंधनकारक आहे. त्याच धर्तीवर ज्येष्ठांना व्यायाम करण्यासाठी योग्य असलेल्या उपकरणांसह आम्ही हे जिम सुरू केले आहे. कुलाब्यात ज्येष्ठांची संख्या अधिक असल्याने त्यांना याचा फायदा होईल, असे नार्वेकर यांनी सांगितले.