महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केली आहे. भाजपच्या या निर्णयामुळे हिंदुत्त्वाच विजय झाल्याचे स्वामी यांनी ट्विटर अकाऊंटवर म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी स्वामी यांनी शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र येण्याची एकत्र गरज व्यक्त केली होती. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या रक्तामध्ये हिंदूत्व आहे. या रक्ताच्या नात्यापोटी दोन्ही पक्षांनी एकत्र यायला हवे असे मत भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मांडले होते. हे दोन्ही पक्ष एकत्र यावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केलेल्या घोषणेमुळे स्वामींची इच्छा जवळजवळ पूर्णच झाली आहे. मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक भारतीय जनता पक्ष (भाजप) लढणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या घोषणेमुळे मुंबईचा महापौर शिवसेनेचाच असेल, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर भाजप-शिवसेना यांच्यात जोरदार सत्तासंघर्ष सुरू होता. महापौर कोणत्या पक्षाचा असेल, याबाबत दोन्ही पक्षांमध्ये जोर बैठका सुरू होत्या. मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी आज, शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस होता. शिवसेनेने आपल्या उमेदवारांची नावे जाहीरही केली होती. भाजप महापौरपदासाठी उमेदवार देणार का, याबाबत कमालीची उत्सुकता होती. पण संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक भाजप लढणार नाही, असे जाहीर केले. याशिवाय स्थायी, बेस्टसह कोणत्याही समितीची निवडणूक लढणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप गरज पडल्यास शिवसेनेला मतदान करू. शिवसेनेशिवाय इतर कोणत्याही पक्षाला मतदान करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.