लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पार धुव्वा उडाल्यावर मध्यल्या काळात झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला बऱ्यापैकी यश मिळाले होते, पण महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पुन्हा एकदा धुव्वा उडाला आहे. मुंबईसह सर्व दहा महानगरपालिकांमध्ये काँग्रेसची कामगिरी फारच सुमार झाली. शहरी भागातील मतदारांनी नाकारले तसेच ग्रामीण भागातही पक्षाला मोठा फटका बसला. महाराष्ट्राच्या शहरी तसेच ग्रामीण भागात भाजपने आपला जम बसविल्याने भविष्यातील राजकारणाकरिता काँग्रेससाठी सूचक इशारा आहे. मुंबईत काँग्रेसला जोरदार फटका बसला. ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर या शहरी भागांतही पक्षाची पीछेहाट झाली. ग्रामीण भाग हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जायचा; पण ग्रामीण भागातही पक्षाला संमिश्र असेच यश मिळाले. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात नारायण राणे यांच्यामुळे काँग्रेसला बहुमत मिळाले. अशोक चव्हाण यांच्या नांदेड, राधाकृष्ण विखे-पाटील व बाळासाहेब थोरात यांच्यामुळे नगर जिल्ह्य़ांत काँग्रेसला यश मिळाले. विदर्भात भाजपची हवा असतानाही अमरावती जिल्हा परिषदेत काँग्रेसला मिळालेले यश उल्लेखनीय आहे. विलासराव देशमुख यांच्यामुळे लातूर, तर सुशीलकुमार शिंदे यांच्यामुळे सोलापूरचे गड वर्षांनुवर्षे काँग्रेसच्या ताब्यात होते. लातूरमध्ये भाजपला बहुमत मिळाले, तर सोलापूरमध्येही पक्षाला फटका बसला. काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव असून, पक्षांतर्गत लाथाळ्या मोठय़ा प्रमाणावर आहेत. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, राधाकृष्ण विखे-पाटील, बाळासाहेब थोरात या नेत्यांमध्ये अजिबात समन्वय कधीही बघायला मिळालेला नाही. एकापाठोपाठ एक पराभवाचे धक्के बसत असले तरी पक्षांतर्गत भांडणे कमी झालेली नाहीत. राज्याचे पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्या कार्यपद्धतीबद्दल तक्रारी कायम आहेत. काँग्रेसच्या या पराभवाचे अपयश हे नेतेमंडळींचे आहे. सामान्य जनता पक्षाबरोबर असली तरी त्याचा फायदा उठविण्यात पक्ष  कमी पडला. वर्षांनुवर्षे सत्तेत राहूनही पक्षाला प्रचारात साहित्य, झेंडे उमेदवारांना देता आले नाहीत. पक्षाची तिजोरी रिती असल्याने खर्च करायचा कोणी, असा प्रश्न निर्माण झाला. प्रचारात कोठेही जोश दिसला नाही. या साऱ्यांचा फटका पक्षाला बसला आहे. नोटाबंदीच्या विरोधात पक्षाने जोर दिला होता; पण यासाठी आवश्यक असणारी वातावरणनिर्मिती करण्यात पक्ष ग्रामीण भागात कमी पडला. नेत्यांनी छायाचित्रे काढण्यापुरते आंदोलने केली.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. देशपातळीवर काँग्रेसबद्दल लोकांच्या मनात अद्यापही विश्वासाची भावना नाही. त्याचा फटका पक्षाला बसला आहे. लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रातून पुढील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये चांगल्या जागांची काँग्रेसला अपेक्षा आहे; पण सध्याची पक्षाची एकूणच स्थिती लक्षात घेता परिस्थिती सुधारेल अशी चिन्हे दिसत नाहीत. यासाठी पक्षाला उभारी देणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. एके काळी महाराष्ट्रावर एकहाती वर्चस्व असलेल्या काँग्रेसला सध्या अस्तित्वासाठी चाचपडावे लागत आहे. हा कल असाच राहिल्यास राज्यात काँग्रेसचे भवितव्य कठीण आहे.