महापालिकेत १२३ नगरसेविका; ९ जणींचा अन्य प्रभागांतून विजय

घटनेने दिलेल्या ५० टक्के आरक्षणाचा आधार न घेता खुल्या प्रभागातून पुरुष उमेदवारांशी दोन हात करणाऱ्या महिला उमेदवारांपैकी ९ जणींनी विजय मिळवल्याने मुंबई महापालिकेतील महिला नगरसेवकांचा आकडा १२३ वर पोहोचला आहे. यामध्ये भाजपमधील ४, सेनेच्या ३ तर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रत्येकी एका महिलेचा समावेश आहे. पाच वर्षांपूर्वी पहिल्यांदाच महानगरपालिकेत निवडून गेलेल्यांपैकी ११ जणी यावेळी खुल्या प्रभागातून लढत होत्या. त्यापैकी चार जणी पुन्हा नगरसेवक म्हणून पालिका सभागृहात प्रवेश करणार आहेत.

पाच वर्षांपूर्वी पहिल्यांदाच ५० टक्के आरक्षण लागू झाले आणि महानगरपालिकेत नगरसेविकांचा टक्का एकदम वाढला. ११४ जागा महिलांसाठी आरक्षित असल्या तरी खुल्या गटातूनही सातजणी निवडून आल्याने पालिका सभागृहात १२१ महिला तर १०६ पुरुष नगरसेवक होते. यावेळी खुल्या गटातून ९ जणी निवडून आल्या आहेत. त्यात भाजपच्या पार्ले येथील ज्योती अळवणी, उपमहापौर असलेल्या वांद्रे येथील अलका केरकर, महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्ष राजेश्री शिरवाडकर तर मलबार हिल येथील सरिता पवार यांचा सहभाग आहे. रिद्धी खुरसुंगे, गीता सिंगण आणि संध्या दोशी या तिघींनी बोरिवलीत खुल्या प्रभागांवर भगवा फडकावून या भागातील सेनेचे आव्हान टिकवले. काँग्रेसकडून संगीता हंडोरे व राष्ट्रवादीकडून राखी जाधव यांनीही पुरुष उमेदवारांना लढत देत पालिकेतील प्रवेश निश्चित केला.

शिवसेनेच्या तृष्णा विश्वासराव, कोमल जामसंडेकर, मनाली तुळसकर, दर्शना शिंदे या खुल्या भागातून लढणाऱ्या नगरसेविकांचा धक्कादायक पराभव झाला तर भाजपच्या रितू तावडे यांनाही १२७ च्या खुल्या प्रभागातून हार पत्करावी लागली. काँग्रेसच्या ज्योत्स्ना दिघे, स्नेहा झगडे यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले.

महिलांची कामगिरी

  • पालिकेच्या २२७ प्रभागांपैकी ११४ महिलांसाठी आरक्षित झाल्यानंतर खुल्या तसेच अन्य आरक्षण गटांसाठी उरलेल्या ११३ प्रभागांपैकी ८० प्रभागांमध्ये महिला निवडणूक रिंगणात होत्या.
  • यापैकी ३३ प्रभागांतून लढणाऱ्या महिला उमेदवारांना राजकीय पक्षांचे पाठबळ लाभले होते.
  • शिवसेनेकडून १२, भाजप व काँग्रेसकडून प्रत्येकी ५, राष्ट्रवादीकडून ७ तर मनसेकडून ४ महिलांना खुल्या प्रभागात उमेदवारी देण्यात आली होती.
  • महिलांसाठी आरक्षित नसलेल्या मात्र मागासवर्गीय आरक्षण असलेल्या ३० पैकी १२ ठिकाणी, अनुसूचित जाती व जमातींसाठी राखीव असलेल्या ८ पैकी ३ ठिकाणी महिला उमेदवार होत्या. कोणतेही आरक्षण नसलेल्या ७५ खुल्या प्रभागांमध्ये सरासरी २० उमेदवार रिंगणात होते व त्यातील ५६ प्रभागांमध्ये महिला उमेदवार उभ्या होत्या.
  • या प्रभागांमधून नऊ महिलांनी विजय मिळवला आहे.
  • श्रद्धा जाधव सहाव्यांदा तर संगीता हंडोरे, संध्या दोशी, राखी जाधव तिसऱ्यांदा विजयी
  • १९९२ पासून सलग सहाव्यांदा महानगरपालिकेवर निवडून जात असलेल्या श्रद्धा जाधव यांनी अनोखा विक्रम केला आहे.
  • संगीत हंडोरे यांनी १९९७ ते २००२ व त्यानंतर २०१२ ते २०१७ या काळात नगरसेवक म्हणून काम केले होते.
  • संध्या दोशी व राखी जाधव या नगरसेविकांचीही ही पालिकेत जाण्याची तिसरी संधी आहे.