मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचारात सर्वच राजकीय पक्षांनी आघाडी घेतली असतानाच मनसे मात्र मागे राहिली होती. मात्र शेवटच्या टप्प्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभा होणार आहेत. येत्या मंगळवारपासून (१४ फेब्रुवारी) राज ठाकरेंच्या सभांना सुरुवात होणार आहे. मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता विक्रोळीतील कन्नमवारनगरमध्ये राज ठाकरेंची पहिली जाहीर सभा होणार आहे.

राज्यात महापालिका आणि जिल्हा परिषदाच्या निवडणूक प्रचारांचा धडका सुरू झाला आहे. राज्यभर राज ठाकरेंचा झंझावती दौरा होणार आहे. राज ठाकरे मुंबईत एकूण तीन सभा घेणार आहेत. १४ फेब्रुवारीला संध्याकाळी ६ वाजता कन्नमवार नगर, विक्रोळीमध्ये राज ठाकरेंची जाहीर सभा होईल. यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी ७.३० वाजता विलेपार्ले पूर्वमध्ये राज ठाकरेंची दुसरी जाहीर सभा होईल. १५ फेब्रुवारीला संध्याकाळी ६ वाजता दिवा, ठाण्यामध्ये राज ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

१६ फेब्रुवारीला रोजी नाशिकमध्ये राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. तर १७ फेब्रुवारीला राज ठाकरे पुण्यात भाषण करणार आहेत. सध्या शिवसेना, भाजपने आघाडी घेत एकमेकांविरोधात दंड थोपटले आहेत. शिवसेना-भाजपकडून दररोज एकमेकांवर जोरदार टीका केली जाते आहे. मात्र अद्याप मनसेच्या प्रचाराला सुरुवातदेखील झालेली नाही. आता राज ठाकरे शेवटच्या टप्प्यात निवडणुकीच्या आखाड्यात उतरुन पक्षाला कितपत यश मिळवून देणार, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.