महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) भूमिका ही मराठी माणसाच्या हिताची असेल, असे सांगत बाळा नांदगावकर यांनी मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेला पाठिंबा देण्याविषयी सकारात्मक संकेत दिले. ते सोमवारी मुंबईत बोलत होते. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेत मनसे सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला मदत करणार किंवा नाही, याविषयी सावध पण सूचक अशी प्रतिक्रिया दिली. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरुच आहे. त्रिशंकू परिस्थितीमुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि अपक्षांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहणे किंवा स्वतंत्र उमेदवार उभा करणे अशा पर्यायांवर काँग्रेस विचार करीत आहे. काँग्रेसचे ३१, तर राष्ट्रवादीचे नऊ नगरसेवक निवडून आले आहेत. हे ४० सदस्य तटस्थ राहिले, किंवा त्यांनी मिळून स्वतंत्र उमेदवार उभा केला तर त्याचा शिवसेनेला फायदा होऊ शकतो. अशावेळी शिवसेना अपक्ष आणि मनसेच्या नगरसेवकांच्या पाठिंब्यावर महापौरपदावर कब्जा करू शकते.

शिवसेनेला पाठिंबा देण्याविषयी विचारले असता आपल्या पक्षाची भूमिका ही मराठी माणसाच्या हिताचीच राहील, असे त्यांनी सांगितले. मराठी अस्मितेसाठी शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही, याचा अंतिम निर्णय आता राज ठाकरेच घेतील. राज ठाकरेंचा निर्णय मराठी माणसाच्या हितासाठीच असेल, हे मी नक्की सांगू शकतो, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले. त्यामुळे मुंबईत निवडून आलेल्या मनसेच्या सात नगरसेवकांचा पाठिंबा सेनेला मिळण्याची शक्यता आहे.  महापालिका निवडणुकांपूर्वी राज ठाकरे यांनी युती करण्यासाठी शिवसेनेसमोर हात पुढे केला होता. मात्र, शिवसेनेने राज यांना टाळी द्यायचे टाळले होते. या पार्श्वभूमीवर उशिरा का होईना शिवसेनेला मनसेचे म्हणणे पटले. त्याचा आम्हाला आनंद असल्याचे नांदगावकर यांनी म्हटले.

सात वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने उभ्या केलेल्या उमेदवारांनी मराठी मतांची विभागणी केल्याने शिवसेना व भाजपचा एकही खासदार निवडून येऊ शकला नव्हता. सात वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आणि यावेळी पालिका निवडणुकीत मनसेचे सातच नगरसेवक आले तरी मनसेकडे मते वळल्याने शिवसेनेचे किमान १४ नगरसेवक या निवडणुकीत नापास ठरले. मराठी अस्मितेची ढाल करून मते मागणाऱ्या या दोन पक्षांमध्ये मतविभागणी होऊन १२ ठिकाणी भाजपचे व दोन ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले.

शक्यता १
शिवसेनेला काँग्रेसने पाठींबा दर्शविल्यास सहजपणे शिवसेनेचा महापौर बसू शकतो.

शिवसेना + अपक्ष + काँग्रेस<br />८४ + ३ + ३१ = ११८

शक्यता २

शिवसेना + अपक्ष + मनसे + { काँग्रेस तटस्थ }
८४ + ३ + ७ = ९४

शक्यता ३

शिवसेना + अपक्ष + मनसे + काँग्रेस
८४ + ३ + ३ + ३१ = १२५

शक्यता ४

शिवसेना + अपक्ष + {मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सपा सगळेच तटस्थ राहिल्यास }
८४ + ३ = ८७