निवडणुकांमध्ये झालेले पानिपत आणि पक्षाला लागलेली गळती यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अस्तित्त्वच संपुष्टात येते का काय, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी शिवसेनेकडे स्वत:हून युती करण्याचा प्रस्तावही मांडला होता. मात्र,  शिवसेनेने हा प्रस्ताव थेट झिडकारून लावला. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनसेची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. याचेच प्रत्यंतर काल मुंबईत झालेल्या पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात आले. या मेळाव्यात ‘एकटा पडलाय राजा, राजाला साथ द्या’, हे गाणे प्रसिद्ध करण्यात आले. काहीसे भावूक बोल असणाऱ्या या गाण्याच्या माध्यमातून मनसेनेकडून राज ठाकरे यांना साथ द्या, अशी आर्त साद घालण्यात आली आहे. खुद्द राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हे गाणं प्रसिद्ध झाले हे विशेष. अवधुत गुप्ते आणि स्वप्निल बांदोडकर यांच्या आवाजात हे गाणे रेकॉर्ड करण्यात आले आहे. मेळाव्यातील व्यासपीठावर या दोन्ही गायकांनी मनसेच्या कार्यकर्त्यांसमोर हे गाणे सादर केले . मनसेची आतापर्यंतची घोडदौड पाहता मनसेने आपली भूमिका प्रांजळपणे कबूल करत सर्व भार पक्षाचा ‘राजा’ अर्थात राज ठाकरे यांच्यावर सोपवली असून आता ‘राजाला साथ द्या’ अशी साद घातली.

दरम्यान, या कार्यक्रमात राज यांनी मराठी माणसांसाठी मी कोणाचेही पाय चाटेन. मात्र मुंबई वेगळी करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे पाय छाटेन, अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी भाजपवर शरसंधान साधले. ‘मी मुंबईतील मराठी माणसांसाठी शिवसेनेसमोर युतीचा प्रस्ताव ठेवला होता. त्यासाठी मी सात फोन केले. मात्र माझ्यासाठी आज हा विषय संपला,’ असे म्हणत मनसे मुंबई महापालिकेत स्वबळावर लढणार असल्याच्या घोषणेचा पुनरूच्चार राज यांनी केला. ‘राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक अस्मितेची फिकीर नसते. त्यामुळेच मुंबई महापालिकेत भाजप नको, म्हणून मी शिवसेनेसमोर युतीसाठी हात पुढे केला होता. मात्र शिवसेनेने युतीसाठी पुढे केलेला हात झिडकारला. कारण प्रश्न पैशांचा आहे. शिवसेनेला भाजपला दुखवायचे नाही. शिवसेनेला केंद्रातील आणि राज्यातील सत्ता शिवसेनेला सोडायची नाही. यामागे आर्थिक कारणे आहेत. शिवसेना आणि भाजप कल्याण डोंबिवलीप्रमाणेच मुंबईत भांडणार आणि त्यानंतर एकत्र येणार,’ अशा शब्दांमध्ये राज ठाकरे शिवसेना आणि भाजपवर बरसले.

‘आम्ही युतीसाठी पुढे केलेला हात शिवसेनेने झिडकारला यामागे आर्थिक कारणे आहेत. शिवसेनेला राज्य आणि केंद्रातील सत्तेतून बाहेर पडायचे नाही. शिवसेनेची नजर महापौर बंगल्यावर आहे,’ अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी शिवसेनेवर शाब्दिक हल्ला चढवला. ‘पाच राज्यांमध्ये निवडणुका आहेत. मुंबई महापालिकेसह दहा महापालिकांमध्ये निवडणुका आहेत. यासोबतच जिल्हा परिषदेच्याही निवडणुका आहेत. नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर भाजप या निवडणुकीसाठा पैसे कसे आणि कुठून आणणार, हेच मला पाहायचे आहे. नोटाबंदीनंतर भाजप नेत्यांकडे व्यवस्थित पैसे येत होते,’ अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी नोटाबंदी आणि त्यानंतर भाजप नेत्यांकडे सापडलेल्या नव्या नोटा यावर भाष्य केले.