बाळा नांदगावकर यांची ‘मातोश्री’वारी; मात्र, उद्धव ठाकरे यांची भेट नाहीच

मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाशी काडीमोड घेऊन, ‘शिवसेना महाराष्ट्रात स्वबळावरच लढेल’, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी जाहीर केले असतानाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी शिवसेनेपुढे युतीचा प्रस्ताव ठेवला. मात्र, हा प्रस्ताव घेऊन ‘मातोश्री’ येथे गेलेले मनसे नेते बाळा नांदगावकर यांना उद्धव ठाकरे भेटले नाहीतच; शिवाय, ‘शिवसेना-मनसे युती शक्यच नाही’, असे शिवसेनेतील एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले.

शिवसेना-भाजप काडीमोड होण्याआधी काही दिवस ‘माझ्याकडे कुणी युतीचा प्रस्ताव घेऊन आल्यास त्यावर विचार करेन’, असे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले होते. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी ‘मनसे स्वबळावर लढेल’, असा पवित्रा राज यांनी घेतला. गेल्या गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी भाजपपासून फारकत घेत आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केल्याने राजकीय चित्र बदलले. या बदललेल्या परिस्थितीत मनसे नेते बाळा नांदगावकर युतीचा प्रस्ताव घेऊन रविवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी दाखल झाले. उद्धव हे बाळा नांदगावकर यांना भेटले नाहीत. शिवसेनेच्या नेत्यांनी नांदगावकर यांचे म्हणणे ऐकून घेतले व ‘याबाबतचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील’, असे त्यांना सांगितले.

बाळा नांदगावकर हे ‘मातोश्री’वर गेल्याने ‘शिवसेना-मनसे युती होणार का’, यावर जोरात चर्चा सुरू झाली असली तरी ‘तसे होणार नाही’, असे शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले. ‘मनसेची राजकीय स्थिती नाजूक असून कोणीच त्यांची फारशी दखल घेत नसल्यामुळेच बाळा नांदगावकर यांना ‘मातोश्री’वर पाठविण्याचा ‘राज’कीय डाव मनसेने टाकला आहे’, असे सेनेचा एका ज्येष्ठ नेता नाव जाहीर न करण्याच्या अटीवर म्हणाला. ‘गेल्या काही वर्षांत मनसेने आपला विश्वास गमावला आहे. लोकांना गृहीत धरू नका, असे कालपर्यंत राज ठाकरे जोरात सांगत होते. आता लोकच त्यांना गृहीत धरत नाहीत. मनसेतून बहुतेक माजी आमदार, नगरसेवक व पदाधिकारी पक्ष सोडून गेले असताना त्यांच्याबरोबर युती करायची ती कोणत्या मुद्दय़ावर?’ असा प्रश्नही या नेत्याने केला. ‘नांदगावकर हे ‘मातोश्री’वर आले खरे; परंतु त्यांना उद्धव ठाकरे यांनी भेट दिली नाही, यावरूनच सारे काही स्पष्ट होते’, अशी पुस्ती त्याने जोडली.

याआधी..

उद्धव यांनी गेल्या निवडणुकीच्या वेळी शिवसेनेच्या मुखपत्राला मुलाखत देत ‘टाळी’साठी हात पुढे केला होता. त्यावेळी ‘वर्तमानपत्रातून अशी टाळी कोणी मागत नसतो’, अशी राज यांनी उद्धव यांची खिल्ली उडवली होती. त्यानंतर लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मनसेचे पानिपत झाले. आता महापालिकेत सेना-भाजप याची युती तुटणार हे स्पष्ट असतानाही मनसेकडून युतीसाठी कोणताही पुढाकार आधी घेण्यात आला नव्हता.

अचानक ‘मातोश्री’ची आठवण कशी?

‘कालपर्यंत आमच्याबरोबर युतीत असलेल्या भाजपला युती तुटताच पालिकेत भ्रष्टाचार असल्याचा, तसेच टक्केवारीत कामे होत असल्याचा साक्षात्कार झाला. अचानक ‘पारदर्शी’पणाच्या उकळ्या त्यांना फुटू लागल्या. मनसे तर रोज शिवसेनेवर चिखलफेक करत होती. मग त्यांना अचानक ‘मातोश्री’ची आठवण कशी झाली?’ असा प्रश्न शिवसेनेतून केला जात आहे.