25 November 2017

News Flash

मुंबईत शनिवारी दिग्गजांच्या समारोपाच्या सभा

सर्वपक्षीय नेत्यांच्या तोफा धडाडणार

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: March 21, 2017 5:16 PM

मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आरोप प्रत्यारोपांनी गाजली असतानाच शनिवारी सर्वच पक्षाच्या दिग्गज नेत्यांच्या समारोपाच्या सभा होणार आहेत. प्रचाराच्या अंतिम टप्प्यातील प्रचारसभांकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा संध्याकाळी सात वाजता बीकेसीतील एमएमआरडीए मैदानावर होणार आहे. तर त्याचवेळी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची सभा दादरमधील कबुतरखान्याजवळ होणार आहे. मनसेने दादर येथील राऊळ मैदानावर सभेसाठी प्रयत्न केले होते. मात्र शिवसेनेने राऊळ मैदान आधीच बुक केल्याने मनसेला कबुतरखान्याजवळ प्रचारसभा घ्यावी लागणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा संध्याकाळी ७ वाजता सोमय्या मैदानावर होणार आहे.

शनिवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दुपारी १२ वाजता राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. तर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची जाहीर प्रचार सभा दुपारी १ वाजता बांद्रा पूर्व येथे होणार आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची जाहीर सभा संध्याकाळी ७ वाजता अँटॉप हिल येथे होणार आहे. रविवारी संध्याकाळी ५ वाजता प्रचाराचा समारोप होणार असल्याने सर्व दिग्गज नेत्यांच्या सभा शनिवारी होणार आहेत.

First Published on February 17, 2017 11:10 pm

Web Title: mumbai municipal corporation election campaign speech shivsena bjp mns uddhav thackeray devendra fadnavis raj thackeray