महापालिका-जिल्हा परिषदांसाठी उद्या मतदान

मुंबईसह दहा महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या मैदानात गेल्या पंधरा दिवसांपासून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचा मारा करणाऱ्या भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे याप्रमुख राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या तोफा रविवारी सायंकाळी शांत झाल्या. मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकांमधील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे राजकीय भवितव्य ठरविणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी मंगळवारी २१ फेब्रुवारीला मतदान होत आहे.

राज्याच्या सत्तेत भाजप-शिवसेना आणि विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, अशा बदललेल्या राजकीय परिस्थितीत महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांना वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातही मुंबई महापालिकेतील गेल्या वीस वर्षांची युती तोडून भाजप व शिवसेना एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. त्यामुळे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष मुंबईच्या निवडणुकीवर केंद्रित झाले आहे.

महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून भाजपने शिवसेनेला पुरेपूर घेरण्याचा प्रयत्न केला. तर, शिवसेनेने िहदुत्व आणि मराठी माणसांचा मुद्दा रेटत भाजपचीही कोंडी करण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या प्रचाराला केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, व्यंकय्या नायडू, अनंतकुमार शहानवाज हुसेन आदी राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी हजेरी लावली, तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकहाती जिल्हा परिषदा आणि महापालिकांचे विशेषत मुंबईचे मैदान गाजविले.

शिवसेनेची प्रचाराची सर्व आघाडी उद्धव ठाकरे यांनी संभाळली.

राज्यातील जिल्हा परिषदा व महापालिकांच्या निवडणुकांमधील काँग्रेसच्या प्रचाराची धुरा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी संभाळली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कार्यपद्धतीवर बरेच नेते नाराज होते. मात्र नंतर हळूहळू गुरुदास कामत, नारायण राणे, नसिम खान, एकनाथ गायकवाड हे नेतेही प्रचारात उतरले. माजी केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम, मनिष तिवारी, ज्योतिरादित्य शिंदे या राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनीही मुंबईत येऊन प्रचारात जान आणण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेच्या प्रचाराची सारी भिस्त त्या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर राहिली.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेवटच्या आठवडय़ात सभांचा धडाका लाऊन प्रचारात काहीशी आघाडी घेतली. भारिप-बहुजन महासंघाचे नेते  प्रकाश आंबेडकर व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बऱ्याच ठिकाणी सभा घेतल्या. एमआयएमच्या प्रचारासाठी तेलंगनातील त्या पक्षाचे नेते आकबरुद्दिन ओवेसी हे मुंबईत ठाम मांडून बसले होते.

अल्पसंख्याक बहुल भागांमध्ये एमआयएमच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळत होता. समाजवादी पक्षानेही आपापल्या प्रभाव क्षेत्रात प्रचाराचा जोर लावला होता. या निवडणुकांमधीस सर्वपक्षीय प्रचाराची रणधुमाळी सायंकाळी साडेपाचनंतर शांत झाली. निवडणूक यंत्रणा आणि सर्वच राजकीय पक्ष मंगळवारी होणाऱ्या दहा महानगरपालिकांच्या आणि ११ जिल्हा परिषदांच्या मतदानासाठी सज्ज झाले आहेत.