‘राजकारण म्हणजे नेमके काय?’ या प्रश्नाला या क्षेत्रातील लोकांकडून वेगवेगळी उत्तरे मिळू शकतात. मात्र, याचे उत्तर देताना जीभ सांभाळायचे भान प्रत्येकालाच पाळावे लागते. त्यामुळे ‘मन की बात’ ओठावर येणार नाही, याची खबरदारी घेतच सारे जण उत्तरे देतात. ‘राजकारण म्हणजे समाजसेवा’ असे कुणी सांगतो, तर कुणी विकासासाठी राजकारण करणार असे सांगतो. कुणाला परिवर्तनासाठी राजकारण करावयाचे असते, तर कुणी देशसेवेचा मार्ग म्हणून राजकारणात पडतात. निवडणुका सुरू असताना मतदारांसमोर हात जोडून मतांचा जोगवा मागणाऱ्या प्रत्येक उमेदवारास आपल्या उमेदवारीचा हाच हेतू असल्याचे कळवळून सांगावेच लागते. तरीही काही उमेदवारांना मात्र, जीभ सांभाळण्याचे तंत्र अवगत झालेच नसल्यामुळे पक्षावर नामुष्कीची वेळ ओढवू लागली आहे. अलीकडेच काळबादेवीतील एका सभेत भाजपचे उमेदवार आकाश पुरोहित यांची जीभ अशीच घसरली. वडिलांची राजनीतीची दुकानदारी पुढे सुरू ठेवण्यासाठी आपण आता निवडणूक लढवत आहोत, असे त्यांनी सांगून टाकले आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी तोंडात बोटे घातली.

आकाश पुरोहित हे भाजपचे माजी मंत्री राज पुरोहित यांचे पुत्र! आकाश पुरोहित यांनी महापालिका निवडणुकीच्या राजकारणात आणण्यासाठी राज पुरोहित यांना पक्षातील आपली सारी प्रतिष्ठा पणाला लावावी लागली होती. राज पुरोहित स्वत जवळपास तीस वर्षांपासून पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश आले, आणि आकाश पुरोहित यांना अखेर उमेदवारी मिळाली. याआधी आकाश पुरोहित यांनी महापालिकेच्या बेस्ट समितीवर स्वीकृत सदस्य म्हणून काम केले असल्याने त्यांचा राजकारणाचा काहीसा अभ्यास व अनुभव असावा. राजकारण म्हणजे काय याचे त्यांचे काही ठोकताळेही असावेत.. त्यानुसार ते तयारीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरले. जोरदार प्रचार मोहीम सुरू झाली. मतदारांशी संपर्क साधण्यासाठी जाहीर सभाही सुरू झाल्या. काळबादेवी परिसरात झालेल्या एका सभेत आकाश पुरोहित यांनी आपली उमेदवारी आणि         राजनीतीचे ‘राज’ मतदारांसमोर खुले करून टाकले. माझे वडील तीस वर्षांपासून राजनीतीची दुकानदारी करीत आहेत. त्यांचा दुकानदारीचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी मला निवडून द्या, असे आवाहन त्यांनी थेट सभेतच करून टाकले, आणि मतदारांनीच नव्हे, तर पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही तोंडात बोट घातले. डोळे विस्फारले, तोंडाचा आ झाला, काहींनी तर टाळ्यांचा कडकडाट केला, एका कोपऱ्यात हास्यस्फोटही झाला.. ..आणि स्वतच्याच भाषणावर खूश होऊन आकाश पुरोहित यांनी स्टेज सोडले!..