News Flash

Municipal Election 2017: पालिका निवडणूक प्रचाराचा आज अखेरचा दिवस, पदयात्रांवर उमेदवारांचा भर

मुंबई पालिकेच्या २२७ जागांसाठी २२७५ उमेदवार रिंगणात आहेत.

राज्यातील १० महानगरपालिका आणि ११ जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराची आज सांयकाळी सांगता होणार आहे.

राज्यातील १० महानगरपालिका आणि ११ जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराची आज सांयकाळी सांगता होणार आहे. मंगळवारी दि. २१ फेब्रुवारीला मतदान तर २३ रोजी गुरूवारी मतमोजणी होणार आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेले राजकीय आरोप-प्रत्यारोप, राजकीय पक्षांची एकमेकांवर सुरू असलेली चिखलफेक थांबणार आहे. आता मतदारांच्या गाठीभेटी, बैठका यावर सर्व राजकीय पक्षांचा भर राहील.
मुंबई पालिकेच्या २२७ जागांसाठी २२७५ उमेदवार रिंगणात आहेत. या वेळी शिवसेना व भाजप यांची युती होऊ शकली नाही. युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांनी व त्यांच्या नेतृत्वाने एकमेकांवर प्रचंड टीका केल्याचे मागील काही दिवसांत दिसून आले. भाजपने पालिकेतील भ्रष्टाचार आणि पारदर्शक कारभाराचा मुद्दा उचलून धरला तर, सेनेने भाजपसोबतची २५ वर्षांची युती संपुष्टात आणली. राज्यातील भाजप सरकारमध्येच पारदर्शक कारभार नसल्याची टीका त्यांनी केली.
काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेने पालिकेतील भ्रष्टाचाराला सेना-भाजप दोघेही जबाबदार असल्याचा हल्ला चढवला. शिवसेना, भाजपने पालिकेची सत्ता काबीज करणार असल्याचा दावा केला असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही एकदा संधी देण्याचे आवाहन मतदारांना केले आहे.
यापूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. १५ जिल्हा परिषदा आणि १६५ पंचायत समित्यांसाठी सुमारे ६९ टक्के मतदान झाले. मतदानाच्या शेवटचे दोन दिवस आणि मतदानाच्या पूर्वसंध्येला चाळी, इमारती, झोपडपट्ट्यांमध्ये साड्या, धान्य, पैसे आणि भेटवस्तूंचे वाटप मोठ्या प्रमाणात होते. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेने १३ स्टॅटिक पथके, ९८ भरारी पथके, ३९ व्हिडिओ सर्व्हेलियन्स पथके तैनात केली आहेत.

या महापालिकांसाठी मतदान: मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, उल्हासनगर, पुणे, सोलापूर, पिंपरी चिंचवड, अकोला, अमरावती.

जिल्हा परिषद दुसरा टप्पा: सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, पुणे, रायगड, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती, गडचिरोली, सांगली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2017 10:27 am

Web Title: municipal election 2017 bmc election 2017 last day of election campaign zp election 2017
Next Stories
1 शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सेवानिवृत्त मेजरचा सायकल प्रवास
2 जांबुवंतराव धोटे..  एका झंझावाताची अखेर!
3 सांगलीत सर्वच पक्षांची घराणेशाही
Just Now!
X