News Flash

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना उमेदवारांमध्ये ‘दंगल’

नागपूरमध्ये गडकरींच्या निवासस्थानाबाहेर भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ

नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाबाहेर भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ.

राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असताना पक्षांमधील अंतर्गत संघर्षही शिगेला पोहोचला आहे. ठाणे, नागपूरमध्ये भाजपमध्ये, नाशिकमध्ये शिवसेना तर अमरावतीमध्ये काँग्रेसमधील कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाड्याजवळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचे वृत्त आहे.

राज्यातील महापालिका निवडणुकीचा प्रचार आता जोर धरला असला आज (शुक्रवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. बंडखोरीच्या भीतीमुळे सर्वच राजकीय पक्षांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. मात्र यानंतरही पक्षातील धूसफूस थांबलेली नाही. ठाण्यात भाजपच्या कार्यालयात राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनाच कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली आहे. रविंद्र चव्हाण हे डोंबिवलीतील भाजपचे आमदार असून त्यांना मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदही देण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील वरिष्ठ नेता आणि मंत्री म्हणून जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मात्र रविंद्र चव्हाण यांनी पैसे घेऊन तिकिट वाटप केल्याचा आरोप ठाण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. रविंद्र चव्हाण यांनी तिकिट वाटप करताना स्थानिकांना विश्वासात घेतले नाही अशी नाराजी भाजपच्या गोटात पसरली आहे. त्यामुळे निवडणुकीत शिवसेनेपेक्षा पक्षांतर्गत वाद थांबवण्याचे आव्हान भाजपसमोर आहे.

नाशिकमध्ये शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्तेंना मारहाण करण्यात आली असून शिवसेनेच्या दोन गटातील वाद यानिमित्ताने समोर आला. माजी महापौर विनायक पांडे यांच्या समर्थकांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना ही घटना घडली. अमरावतीमध्येही काँग्रेसच्या शहराध्यक्षांना कार्यकर्त्यांनीच मारहाण केली आहे.

नागपूरमध्ये भाजपच्या तिकिट वाटपावरुन वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि सध्या बजरंगमध्ये असलेले श्रीकांत आगलावे यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र शुक्रवारी भाजपने जाहीर केलेल्या यादीत श्रीकांत आगलावे यांची वर्णी लागली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या श्रीकांत आगलावे यांच्या समर्थकांनी थेट गडकरी यांच्या निवासस्थानाबाहेर धाव घेत जोरदार घोषणाबाजी केली. तर भाजपच्याच विद्यमान नगरसेविका चेतना टांक यांना उमेदवारी मिळू नये यासाठी भाजपच्या काही महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 2:10 pm

Web Title: municipal election 2017 fight between candidates over tickets in all parties
Next Stories
1 Municipal Corporation LIVE : शिवसैनिकांचा विरोध डावलून स्नेहल आंबेकरांना वॉर्ड क्र. १९८ मधून उमेदवारी
2 महिलाराज!; मुंबई महापौरपद खुला प्रवर्गासाठी, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे महिलांसाठी राखीव
3 BMC Election 2017: भाजपची पहिली यादी जाहीर; दादरमध्ये शिवसेनेला आणखी एक धक्का
Just Now!
X