News Flash

पंकजा मुंडेंकडून अपेक्षाभंग; धनंजय भाऊंचे कामगिरीवर प्रश्नचिन्ह

पंकजा मुंडे यांना खूपच लवकर मंत्रिपद

पंकजा मुंडेंकडून अपेक्षाभंग; धनंजय भाऊंचे कामगिरीवर प्रश्नचिन्ह
पंकजा आणि धनंजय मुंडे ( संग्रहित छायाचित्र)

राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना सहजासहजी मंत्रिपद मिळाले आहे. पण त्यांची गेल्या दोन वर्षांतील कामगिरी पाहता सर्वसामान्यांचा अपेक्षाभंगच झाला, अशा शब्दांत पंकजा यांचे भाऊ आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी त्यांच्या कामगिरीचे विश्लेषण केले.

‘लोकसत्ता ऑनलाइन’ने आज, मंगळवारी ‘फेसबुक लाईव्ह चॅट’चे आयोजन केले. त्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्यातील वाचकांशी संवाद साधला. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. यावेळी धनंजय मुंडे यांच्या बहिण आणि राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या कामगिरीविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावर पंकजा यांच्या कामगिरीवर मुंडे यांनी असमाधान व्यक्त केले. पंकजा मुंडे यांना खूपच लवकर मंत्रिपद मिळाले. इतके मोठे पद मिळवण्यासाठी खरे तर संघर्षातून मिळवावे लागते. पण आमच्या बहिण मुंडे यांना ते अगदी सहज मिळाले. खरे म्हटले तर, मंत्रिपदाचा वापर सर्वसामान्यांच्या सदुपयोगासाठी व्हावा, अशी अपेक्षा आहे. पण गेल्या दोन वर्षांत केवळ अपेक्षाभंग झाला, असे सांगत धनंजय मुंडे यांनी पंकजा यांच्या कामगिरीवर बोट ठेवले. भविष्यात पंकजा आणि धनंजय मुंडे एकत्र येतील का, या प्रश्नावर त्यांनी अधिक बोलणे टाळले असले, तरी त्याबाबत पंकजा यांनाच विचारलेले बरे, असे ते म्हणाले.

धनंजय मुंडेंची चौफेर फटकेबाजी!

– कॅम्पेनिंग करण्यात राज्य सरकार आघाडीवर आहे. आतापर्यंत नुसत्या घोषणाच केल्या. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाही.

– भाजपचे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी, त्यांना वाचवण्यासाठी कर्जमाफी करावी. दुष्काळाने शेतकरी होरपळतोय. त्यांना कर्जमाफी करून दिलासा द्यावा.

– शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, अशी मागणी दोन वर्षांपासून लावून धरली आहे. पण हे सरकार शेतकऱ्यांच्याच विरोधात आहे. हमीभावात वाढ करणे गरजेचे आहे.

– शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या, पण अंमलबजावणी नाही. या सरकारचा निषेध करत आहोत. आगामी अधिवेशनात या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरू.

– ‘अच्छे दिन’ ऐकायला बरे वाटते. पण त्याने बेरोजगारी कमी झाली नाही. नोटाबंदीने बेरोजगारी वाढेल. नोटाबंदीचा पुढील काही वर्षे मोठा फटका बसेल. त्याला केंद्र आणि त्याचे समर्थन करणारे राज्य सरकार जबाबदार असेल.

– मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. ३१ जानेवारीला मराठा समाजातर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे, अशी त्यांची ठाम मागणी आहे. त्यांच्या मागणीचे मी समर्थन करतो.

– छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या नावाखाली मराठा समाजाच्या मागण्या दाबण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. हे योग्य नाही.

– मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या विरोधात हे राज्य सरकार आहे. त्यांना बहिष्कृत नजरेने पाहणे, हे दुर्दैवी आहे.

– ओबीसी समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.

-जातीपातीच्या पलिकडेही जाऊन राजकारण करावे. जास्तीत जास्त तरुण राजकारणात आले तर राजकारणाला लागलेली जातीयवादाची किड नष्ट होण्यास मदत होईल.

– राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांचे घोटाळे बाहेर आले आहेत. त्या घोटाळेबाजांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली आहे. पुरावे देऊनही त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई होत नाही. त्यांनी खात राहावे आणि आम्ही संभाळून घ्यावे, अशीच भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.

– घोटाळेबाजांना मुख्यमंत्री वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत. त्यातून सिद्ध झाल्यास न्यायालय राज्य सरकारला चौकशीचे आदेश देईनच. त्यानंतर राज्य सरकार उघड्यावर पडेल.

– मुंबई महापालिका निवडणुकीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. नगरसेवकांची सध्याची जी संख्या आहे, त्यात वाढ करण्याचा प्रयत्न असेल. भविष्यात मुंबई आणि विदर्भात राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकावर असेल.

– पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणारच. भाजपने कितीही प्रयत्न केले तरी त्याचा फायदा होणार नाही.

– तीन महिन्यांपूर्वी पक्षाची राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. येत्या निवडणुकांना कर्तुत्व असलेल्या पक्षातील तरुणांनाच संधी दिली जाणार आहे.

– भाजपमध्ये गुंडांना प्रवेश दिला जात आहे. ‘पार्टी ऑफ डिफरन्स’ म्हणवून घेतल्या जाणाऱ्या पक्षात वेगळाच डिफरन्स दिसत आहे. तुरुंगातून सुटलेले गुंड भाजपत पापमुक्तीसाठी जात आहेत. काशीला जाण्याऐवजी भाजपत जा, असे गुंड म्हणू लागले आहेत, असे विनोद सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून गुंडाचा वापर केला जात आहे.

– सत्तेचा वापर नेते फोडण्यासाठी केला जात आहे. मागील विधानसभेच्या निवडणुकीतही तसाच प्रकार केला होता. पक्षातील आऊटगोईंगचा काहीही परिणाम होणार नाही.

– महाराष्ट्रातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी काही योजना असतील, तर त्या आणण्याबाबत प्रयत्न करू शकतो.

– मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जात आहेत. त्यामुळे ते उद्ध्वस्त होतील. याबाबत केंद्राकडे पाठपुरावा केला जाईल.
– जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक प्रश्न सोडवता येऊ शकतात.

– बीड जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार असूनही मागासलेपण गेलेले नाही. भाजप अपयशी ठरले आहे.

– भाजपमधून बाजुला केले. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. कारण जनतेच्या हितासाठी राष्ट्रवादी पक्ष काम करतो. शब्द पाळणारा एकमेव पक्ष आहे.

– राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राजकारणातील चालते-बोलते विश्वविद्यापीठ आहे.

– पंतप्रधानांनी बारामतीतील काम पाहून पवार यांची स्तुती केली आहे. त्यांना सन्मान स्वीकारायलाच हवा. विरोधी पक्षनेता म्हणून माझी भूमिका वेगळी आहे. सरकार कमी पडत असेल तर त्यांना जागे करण्याचे काम माझे आहे. सरकारविरोधात संघर्ष करण्याचे माझे काम आहे.

– राम गणेश गडकरी पुतळा वादावर सरकारने लोकभावनेचा आदर करायला हवा. सरकार मात्र जबाबदारीपासून दूर पळत आहे.

– औद्योगिक क्षेत्रात राज्याची घसरण झाली आहे.

– सरकारमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आहे. येथे पोलिसच सुरक्षित नाहीत. सत्ताधारी पक्षाचे नेतेच पोलिसांना दमदाटी करतात.

– राज्य आणि केंद्र सरकार हे घोषणाबाजांचे सरकार आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका.

– गोपीनाथ मुंडे यांनी सर्वसामान्यांसाठी संघर्ष केला. तो पुढे चालूच ठेवणार. त्यासाठी आणखी आक्रमक होईल. मुंडे सर्वसामान्यांशी जोडलेले लोकनेते होते. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे हा त्यांचा गुण माझ्या अंगी आहे.

– माझ्या वक्तृत्वात दीवंगत प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचा प्रभाव.

– कोणतेही पद राजकीय संघर्षातून मिळवावे लागते. पंकजा मुंडे यांना ते मिळाले आहे. पद मिळूनही त्यांच्याकडून अपेक्षाभंग झाला.

– तरुणांनी राजकारणाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. त्यांच्यात परिवर्तनाची ताकद आहे. त्यांनी अन्यायाविरोधात लढले पाहिजे. एक मोठी चळवळ उभी करण्याची ताकद त्यांच्यात आहे. अधिकाधिक तरुणांनी राजकारणात यावे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2017 5:31 pm

Web Title: ncp leader dhananjay munde talk on minister pankaja munde leadership munde family
Next Stories
1 मुंबईतील दाणाबंदरमधील आग पतंगाच्या मांज्यामुळे
2 डोंबिवलीत महाविद्यालयाबाहेर तरुणाची हत्या
3 घोटाळेबाजांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची ‘क्लीन चिट’ प्रायव्हेट लि. कंपनी!: धनंजय मुंडे
Just Now!
X