राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात मुंबईकरांना आश्वासन

५०० चौरस फुटापर्यँतच्या घरांना मालमत्ता करातून सुट देण्यावरून शिवसेना आणि भाजपात सामना रंगलेला असतांनाच आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही या वादात उडी घेतली आहे. शहरात ७०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सुट देतांनाच ७०० लिटपर्यंत मोफत पाणी आणि अवघ्या १०१ रूपयात कोणत्याही रूग्णालयात उपचार अशा अनेक आश्वासनांची खैरात राष्ट्रवादीने जाहिरनाम्यात केली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षांने आतापर्यत १११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहेत. आणखी काही उमेदवारांची घोषणा लवकरच केली जाणार असून येत्या ४ फेब्रुवारी रोजी पक्षाचे राष्ट्ीय अध्यक्ष शरद पवार, खासदार प्रफुल्ल पटेल आदींच्या उपस्थितीत मानखुर्द येथे जाहीर सभेने प्रचाराचा नारळ फुटणार आहे अशी माहिती मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिली. शहरात आतही ३५ टक्के पाण्याची गळती असून ती पूर्णपणे बंद करण्याबरोबरच लोकांना ७०० लीटपर्यंत मोफत आणि स्वच्छ पाणी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मुंबईकरांसाठी अवघ्या १०१ रूपयांच्या बदल्यात वैद्यकीय उपचार देणारी निरामय आयोग्य योजना राबविण्यात येईल. महापालिकेतर्फे नागरिकांचा आरोग्य विमा उतरविला जाणार असून त्यातून महापालिका वा खाजगी रूग्णालयातून  सर्व प्रकारचे आजारांवर मोफत उपचार घेण्याची सुविधा मिळू शकेल. बेस्टमधून प्रवास करणाऱ्यांना दिलासा देण्यासाठी बेस्टचे किमान भाडे पाच रूपये केले जाईल. महापालिकेतील भ्रष्टाचार बंद करण्यासाठी कोणत्याही प्रकल्पांचे काम करतांना ग्लोबल टेंडर्स काढले जातील. त्याचप्रमाणे अंतर्गत रस्त उड्डाणपुलांनी जोडतांना नवीन पार्किंग पॉलिशीही लाग करणार तसेच शहरात कोठेही कचरा असल्यास नागरिकांनी व्हॉट्सअप अथवा एसएमएसच्या माध्यमातून तक्रार करताच त्वरित कचरा उचलण्याची व्यवस्था निर्माण करण्याचे आश्वासनही या वचननाम्यात देण्यात आले आहे.

काँग्रेस,राष्ट्रवादीचे सूर जुळलेच नाहीत

मुंबई : ठाणे वगळता काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडीचे सूर जुळलेले नाहीत. जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांमध्येही काही अपवाद वगळता आघाडी होऊ शकलेली नाही.

ठाणे महानगरपालिकेत आघाडी होईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला. पुणे महानगरपालिकेत आघाडीबाबत सारेच अनिश्चित होते. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यातील चर्चेतून उद्या दुपापर्यंत तोडगा काढण्याचे प्रयत्न होणार आहेत. सोलापूरमध्ये आघाडी होऊ शकलेली नाही. नागपूर, अमरावती, अकोल्यातही आघाडीचा तोडगा निघालेला नाही.

१५ जिल्हा परिषदा आणि १६५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत बुधवारी संपली. काही तालुक्यांमध्ये आघाडी झाली असली तरी जिल्हा पातळीवर आघाडी होऊ शकलेली नाही.