News Flash

मुंबई महापालिका निवडणुकीत ‘आघाडी’त बिघाडी, काँग्रेस स्वबळावर लढणार

समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचे काँग्रेसचे संकेत

मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये यूतीबाबत चर्चेला सुरुवात होणार असतानाच दुसरीकडे काँग्रेस – राष्ट्रवादी ‘आघाडी’मध्ये बिघाडी झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होणार नसल्याचे काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसने महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली असून अन्य समविचारी पक्षांशी आघाडी करण्यास तयार असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

मुंबईत सोमवारी टिळक भवनमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अन्य ज्येष्ठ नेते उपस्थित होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीसोबत आघाडी करायची की नाही याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. आघाडीबाबत चर्चा करण्यापूर्वीच राष्ट्रवादीने उमेदवारांची यादी जाहीर केल्याने काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. सविस्तर चर्चा केल्यानंतर मुंबईत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईत आघाडी झाली नसली तरी राज्यातील अन्य भागांमधून स्थानिक नेत्यांकडून प्रस्ताव आल्यास राष्ट्रवादीसोबत आघाडी करु असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

महापालिका निवडणुकीत आघाडी होणार नसली तरी विधान परिषद निवडणुकीसाठी आघाडी कायम असल्याचे त्यांनी सांगितले. अमरावती, नाशिक, नागपूर, कोकण, औरंगाबाद या भागातून विधान परिषद निवडणूक होणार आहे. समविचारी पक्षासोबत आघाडी करु असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. शिवसेना, एमआयएम आणि भाजपसारख्या जातीयवादी पक्षांसोबत आघाडी करणार नाही. एमआयएम हा पक्ष सध्या भाजपसाठी कंत्राटावर काम करत असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली.

मुंबईत आघाडी होणार नाही असे चित्र आधीपासून दिसत होते. महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने उमेदवारांची यादी जाहीर केली होती.  मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी यावर आक्षेप घेतला होता. आघाडीपूर्वीच राष्ट्रवादीने यादी जाहीर केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांना आघाडी होऊ नये असे वाटत असल्याचे निरुपम यांनी म्हटले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसने संजय निरुपम यांच्यामुळे आघाडी होत नसल्याचे म्हटले होते. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या आडमुठ्या धोरणामुळे मुंबई महापालिका निवडणूक राष्ट्रवादीला नाइलाजाने स्वतंत्रपणे लढवावी लागत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 5:09 pm

Web Title: no alliance between congress and ncp in bmc election 2017
Next Stories
1 मराठा आरक्षणाचा मुद्दा तापणार?
2 आता लढाई ‘सैनिक’ विरुद्ध ‘मावळे’!
3 भाजपचा चेहरा व मुखवटा वेगळा
Just Now!
X