सरकारमधून बाहेर पडण्याचे संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर राजीनामा खिशात घेऊन फिरत असल्याचे सांगणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांवर काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सडकून टीका केली आहे. राजीनामा खिशात घेऊन फिरणे ही केवळ स्टंटबाजी आहे. लोकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे ते म्हणाले आहेत.

राज्यातील सरकार नोटीस पिरियडवर आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईतील प्रचारसभेत म्हणाले होते. त्यानंतर शिवसेनेचे मंत्री आपल्या पदाचा राजीनामा देतील का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर राजीनामा खिशातच घेऊन फिरत आहोत, असे शिवसेनेच्या मंत्र्यांनी सांगितले होते. त्यामुळे कोणत्याही क्षणी हा नोटीस पिरियड संपेल, असे शिवसेनेचे नेतेही म्हणू लागले आहेत. शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी काल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानीही भेट घेतली होती. त्यावेळी शिवसेनेचे मंत्री राजीनामा देतील, अशी जोरदार चर्चा रंगली होती. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी मंत्र्यांनी केली होती. त्यानंतर वर्षा निवासस्थानातून बाहेर पडल्यावर शिवसेनेच्या मंत्र्यांनी खिशात राजीनामा घेऊन फिरत असल्याचे सांगितले होते. यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. राजीनामे खिशात घेऊन फिरणे ही केवळ स्टंटबाजी आहे. केवळ मनोरंजन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडली आहे. मात्र, सरकारमधून बाहेर पडले नाहीत, असे दानवे यांनी स्पष्ट केले आहे. ज्या दिवसापासून शिवसेना सत्तेत सहभागी झाली आहे, तेव्हापासून शिवसेनेचे मंत्री राजीनामा खिशात घेऊन फिरत आहेत, अशी उपरोधिक टीकाही दानवे यांनी केली आहे.