फोर्ट, कुलाब्यातच परिसरातच राजकीय पुढाऱ्यांच्या शुभेच्छा वा कार्यक्रमांच्या फलकांना ऊत; परिसराचे विद्रुपीकरण

मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांकरिता आचारसंहिता जाहीर होऊन आठवडा झाला तरी मुंबईत राजकीय नेत्यांची फलकबाजी सुरूच आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या मुख्यालय असलेल्या फोर्ट आणि कुलाबा परिसरातच असे राजकीय फलक पाहायला मिळत असल्याने पालिकेच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ११ जानेवारीला निवडणुकांची घोषणा केली. त्याच क्षणापासून आचारसंहिता लागू झाल्याचे घोषित केले. असे असतानाही या राजकीय पुढाऱ्यांनी शहरातील फलकबाजी आवरती घेतलेली नाही. फलकबाजी करून शहर विद्रूप करण्याच्या या प्रकाराबद्दल उच्च न्यायालयानेही वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर पालिकेने शहरभरातून ठिकठिकाणाहून हजारोंच्या संख्येने फलक उतरवले. परंतु, आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरही नेत्यांनी या बाबत गांभीर्य दाखविलेले नाही. मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आलेले राजकीय मंडळींचे बॅनर आठवडा झाला तरी ‘जैसे थे’ आहेत.

आचारसंहिता लागू झाली तरी त्यापूर्वी लावण्यात आलेले फलक उतरविण्याचे कष्ट राजकीय पक्षाने व महापालिकेने घेतलेले नाही. त्यावरून आचारसंहितेबाबत राजकीय पक्ष व महापालिका विभाग किती गंभीर आहेत हे स्पष्ट होते. महापालिकेचे मुख्यालय असलेल्या ए वॉर्डमधील कुलाबा परिसरातच अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या शुभेच्छा वा इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने लावलेले फलक जैसे थे आहेत. यात मुरली देवरा यांची जयंतीचे फलक माजी नगरसेवक पुराण दोशी यांच्या फोटोसह झळकत आहेत.

विद्यमान अपक्ष नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी शुभेच्छांचे फलक लावलेत. फलकावर झळकणारे फोटोमधील अपक्ष नगरसेवक मििलद नार्वेकर व माजी नगरसेवक पुराण दोशी हे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे कळते. आचारसंहिता सुरू झाली तरी फलक न काढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

..तर कारवाई करू

महापालिका विभागाने आचारसंहिता पथक सुरू केले आहे. ते पथक संपूर्ण शहरात पूर्वी लावण्यात आलेले बेकायदा फलक काढण्याची वा ते झाकण्याची कारवाई करत आहे. आचारसंहितेपूर्वी लावलेले फलक काढण्याची कारवाई सुरू आहे. त्यानंतर जे फलक लावले जातील त्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कडक कारवाई करण्यात येईल.

– किरण दिघावकर, सहायक आयुक्त, महापालिका ए वॉर्ड