भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे ठरविले आहे. पंजाबात भारिपच्या वतीने ३० जागा लढविण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यांचा प्रचाराचा रोख भाजपविरोधी राहणार आहे. तर, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपले बस्तान बसविण्याचा प्रयत्न सुरु केला असून, त्यासाठी बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनाच त्यांनी टीकेचे लक्ष्य केले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला आहे. मात्र त्या आधीच विविध राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्षाचे मेळावे घेऊन प्रचाला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशातील मायावती या ताकदवान नेत्या आहेत. त्यांच्या पक्षाची लढत प्रामुख्याने भाजप व समाजवादी पक्षाशी होणार आहे. आठवले यांनी मात्र मायावती यांनाच लक्ष्य केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी हाच खरा पक्ष आहे, बसप नाही, अशी टीका ते मायावती यांच्यावर करतात. उत्तर प्रदेशात भाजपबरोबर युती करुन निवडणूक लढविण्याचा विचार आहे, परंतु त्यांच्याकडून  रिपब्लिकन पक्षाला जागा मिळतील की नाही, याबाबत अनिश्चितता आहे, असे आठवले यांनी सांगितले. युती झाली  किंवा नाही झाली, तरी केंद्रात मंत्री असलेल्या आठवले यांची भूमिका मात्र भाजपच्या बाजुनेच राहणार आहे.

प्रकाश आंबेडकर गेले अनेक दिवस पंजाबमध्ये तळ ठोकून होते. तेथील पंजाब आपना दल सारख्या स्थानिक पक्षांशी हातमिळवणी करुन निवडणुका लढविण्याचे त्यांनी ठरविले आहे. भारिप-बहुजन महासंघाच्या वतीने पंजाबमध्ये ३० जागा लढविण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. त्यांचा प्रचाराचा रोख भाजपच्या विरोधात राहणार आहे.