येत्या २१ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या राज्यातील दहा महानगरपालिका, ११ जिल्हा परिषद आणि २८३ पंचायत समिती निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी  राज्य निवडणूक आयोगाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी ही सुट्टी देण्यात आल्याचे आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. सरकारी, निमसरकारी कार्यालयांबरोबरच खासगी क्षेत्रातील दुकाने व आस्थापना, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, नाटय़गृह, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याचे आदेशही संबंधितांना देण्यात आले आहेत. मात्र कामगारांच्या अनुपस्थितीमुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान होईल अशा आस्थापनेतील/उद्योगातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी संपूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास त्यांना किमान दोन तासांची किंवा मतदानाचा हक्क बजावता येईल अशी सवलत कामाच्या वेळेत देण्याचे आदेश कामगार विभागातर्फे काढण्यात आले आहेत.

राज्यातील महापालिकांची मुदत ४ मार्च ते ३ एप्रिलदरम्यान विविध तारखांना संपणार आहे. तर जिल्हा परिषदांची मुदत २१ मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, अकोला, अमरावती आणि सोलापूर या १० महापालिकांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. याशिवाय, रायगड, रत्नागिरी , सिंधुदुर्ग, नाशिक, अकोला, पुणे, सातारा, सांगली , सोलापूर, कोल्हापूर, अमरावती आणि गडचिरोली या ११ जिल्हा परिषदा व त्यांतर्गत येणाऱ्या ११८ पंचायत समित्यांसाठीही २१ फेब्रुवारीलाच मतदान होणार आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची मतमोजणी २३ फेब्रुवारी रोजी होईल.