मराठी माणसांसाठी मी कोणाचेही पाय चाटेन. मात्र मुंबई वेगळी करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे पाय छाटेन, अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी भाजपवर शरसंधान साधले. ‘मी मुंबईतील मराठा माणसांसाठी शिवसेनेसमोर युतीचा प्रस्ताव ठेवला होता. त्यासाठी मी सात फोन केले. मात्र माझ्यासाठी आज हा विषय संपला,’ असे म्हणत मनसे मुंबई महापालिकेत स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे.

‘राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक अस्मितेची फिकीर नसते. त्यामुळेच मुंबई महापालिकेत भाजप नको, म्हणून मी शिवसेनेसमोर युतीसाठी हात पुढे केला होता. मात्र शिवसेनेने युतीसाठी पुढे केलेला हात झिडकारला. कारण प्रश्न पैशांचा आहे. शिवसेनेला भाजपला दुखवायचे नाही. शिवसेनेला केंद्रातील आणि राज्यातील सत्ता शिवसेनेला सोडायची नाही. यामागे आर्थिक कारणे आहेत. शिवसेना आणि भाजप कल्याण डोंबिवलीप्रमाणेच मुंबईत भांडणार आणि त्यानंतर एकत्र येणार,’ अशा शब्दांमध्ये राज ठाकरे शिवसेना आणि भाजपवर बरसले.

‘आम्ही युतीसाठी पुढे केलेला हात शिवसेनेने झिडकारला यामागे आर्थिक कारणे आहेत. शिवसेनेला राज्य आणि केंद्रातील सत्तेतून बाहेर पडायचे नाही. शिवसेनेची नजर महापौर बंगल्यावर आहे,’ अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी शिवसेनेवर शाब्दिक हल्ला चढवला. ‘पाच राज्यांमध्ये निवडणुका आहेत. मुंबई महापालिकेसह दहा महापालिकांमध्ये निवडणुका आहेत. यासोबतच जिल्हा परिषदेच्याही निवडणुका आहेत. नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर भाजप या निवडणुकीसाठा पैसे कसे आणि कुठून आणणार, हेच मला पाहायचे आहे. नोटाबंदीनंतर भाजप नेत्यांकडे व्यवस्थित पैसे येत होते,’ अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी नोटाबंदी आणि त्यानंतर भाजप नेत्यांकडे सापडलेल्या नव्या नोटा यावर भाष्य केले.

‘शिवसेना-भाजपला २५ वर्षांमध्ये मुंबईत जे जमले नाही, ते मी ५ वर्षांमध्ये नाशिकमध्ये केले आहे. भाजप आता शिवसेनेच्या कारभारावर आणि घोटाळ्यांवर टीका करते आहे. २५ वर्षे भाजप शिवसेनेसोबत सत्तेत होता. त्या कारभारात त्यांचाही वाटा आहे. नाशिक महापालिकेवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही. मात्र मुंबईच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी १०० कोटींचे कंत्राट काढले जाते,’ अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि भाजपवर तोंडसुख घेतले.

नोटाबंदीचा निर्णय जाहीर करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरदेखील राज ठाकरेंनी शरसंधान साधले. ‘नोटाबंदीच्या निर्णयानंतर देश बदलेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. देशात काय बदल झाला? दररोज घराच्या खिडकीतून बाहेर पाहतो. सर्वकाही आधीसारखेच दिसते. देशात नेमके काय बदलले आहे ?,’ असा सवाल करत राज ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला. ‘गुगलवर फेकू शब्द टाकला की पंतप्रधान मोदींचे नाव येते. जगात आमच्या पंतप्रधानांची प्रतिमा फेकू अशी आहे,’ असे म्हणत राज ठाकरेंनी मोदींवर बोचरी टीका केली. ‘मी निर्णय बदलले की माझ्यावर टीका होते. मात्र नोटाबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी तब्बल ५६ वेळा निर्णय बदलले. त्यावर कोणीच बोलत नाही,’ अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी मोदी सरकारला धारेवर धरले.