महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ११ व्या वर्धापनदिनानिमित्त आज राज ठाकरे यांनी भाषण केले. महानगर पालिकेमध्ये मनसेला मोठी हार पत्करावी लागली.  काम करूनही आम्ही हरलो आणि ज्या लोकांनी पैसा वाटला त्यांनाच जनतेनी जिंकवून दिले असे ते म्हणाले. गेली पाच वर्षे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी जनतेसाठी भरपूर कामे केली. प्रत्येक वेळी मनसेचे नगरसेवक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी जनतेच्या कामी आले परंतु त्यांना निवडून न देता केवळ ज्या लोकांनी पैसा वाटला त्या लोकांना जनतेनी निवडून दिले असे ते यावेळी म्हणाले. काही ठिकाणी असे उमेदवार उभे करण्यात आले होते. ज्यांची नावे देखील माहित नव्हती. परंतु त्यांनी आपल्या पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या. असे ते यावेळी म्हणाले.

गेल्या पाच वर्षांमध्ये नाशिक महानगर पालिकेमध्ये आम्ही खूप कामे केली. बाहेरुन पैसा आणून ओतला. नाशिक शहराचा कायापालट केला परंतु नाशिकच्या लोकांनी मात्र बाहेरुन आलेल्या लोकांना निवडून दिले. ही बाब अतिशय खराब आहे असे ते म्हणाले. तुम्ही जो पायंडा पाडला आहे त्याने तुमचेच भविष्यात नुकसान होणार आहे असे ते म्हणाले. ज्या भारतीय जनता पक्षाने सर्व पक्षातून लोकांची आयात केली त्यांना तुम्ही जिंकवून दिले असे ते म्हणाले.

या पुढे मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापिही हरणार नाही ही गोष्ट ध्यानात ठेवा असे ते म्हणाले. गेल्या कित्येक वर्षांपासून आपण केवळ सौम्य धोरणाचा वापर करुनच निवडणुकांना सामोरे गेलो आहोत परंतु यापुढे मात्र आपण सर्व विरोधक ज्या मार्गांचा अवलंब करत आहेत ते मार्ग अवलंब करणार आहोत असा इशारा त्यांनी दिला. या आधी तुम्ही लोक मला भेटण्यासाठी येत होता परंतु यापुढे मात्र माझे सर्व नेते आणि मी तुमच्या भेटीला येत जाणार आहोत असे त्यांनी यावेळी म्हटले.

आपण केवळ हे तुमचा धीर वाढवण्यासाठी म्हणत नाही असे देखील ते म्हणाले. विरोधक जे फासे टाकत होते तेच फासे आता माझ्या हाती आले आहेत. तेव्हा ही शेवटची निवडणूक आहे ज्यामध्ये मनसेला हार पत्करावी लागली आहे. यापुढे आपला केवळ विजय होईल असे म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.