स्वबळावर लढण्यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाने मुंबई महापालिकेसह राज्यातील दहा महानगरपालिका व २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपबरोबर युती करण्याची घोषणा केली. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत भाजपकडून जागावाटपाचा घोळ कायम राहिल्याने रिपब्लिकन पक्षाची राजकीय फरफट सुरु आहे. भाजपकडून सन्मानपूर्वक जागावाटप होत नसेल, तर मुंबईसह सर्वच निवडणुका स्वबळावर लढाव्यात यासाठी कार्यकर्त्यांकून पक्षनेतृत्वार दबाव आणला जात आहे.

रामदास आठवले यांचा पक्ष कायम प्रस्थापित पक्षांबरोबर युती करुन निवडणुका लढवित आला आहे. १९९२ मध्ये आठवले यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसबरोबर युती केली. त्यावेळी काँग्रेसच्या चिन्हावरच रिपब्लिकन उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. त्याचा फायदा त्या पक्षाला झाला. रिपाइंचे १२ उमेदवार निवडून आले आणि त्यावेळी त्यांच्या पक्षात असलेले चंद्रकांत हंडोरे यांना महापौरपद मिळाले.

त्यानंतर काँग्रेस व पुढे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करुन मुंबई महापालिकेच्या निवडणुका रिपाइंने लढविल्या. परंतु त्याचा फारसा लाभ मिळाला नाही. २००७ मध्ये डाव्या पक्षांबरोबर रिपाइंने युती केली होती. त्यावेळी पक्षाचे तीन नगरसेवक निवडून आले. २०१२ मध्ये शिवशक्ती-भीमशक्तीचा नारा देत भाजप-शिवसेनेबरोबर आघाडी करुन रिपाइंने २९ जागा लढविल्या. परंतु त्यापैकी फक्त एकाच जागेवर विजय मिळाला.

या वेळी  रिपब्लिकन पक्षाने भाजपबरोबर युती करण्याची घोषणा केली. त्यानुसार पक्षाने ६५ जागांचा प्रस्ताव मुंबई भाजपचे अध्यक्ष अ‍ॅड. अशिष शेलार यांना दिला.त्यावेळी भाजपकडून रिपाइंला केवळ २५ जागा सोडण्याची तयारी दर्शविण्यात आल्याचे समजते. त्यामुळे रिपाइं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. गुरुवारी पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या उपस्थितीत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.