09 March 2021

News Flash

रिपब्लिकन पक्षाची २५ वर्षांची परंपरा खंडित

मुंबईच्या वेगवेगळ्या भागांत संघटितपणे राहात असलेल्या आंबेडकरी समाजाची राजकीय ताकद आहे.

मुंबई पालिकेत एकही नगरसेवक नाही

मुंबई महापालिकेचे दोन वेळा महापौरपद भूषविण्याची संधी मिळालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांची या निवडणुकीत धूळधाण झाली. मुंबई महापालिकेवर एक तरी नगरसेवक निवडून येण्याची गेल्या २५ वर्षांची परंपरा या निवडणुकीत पहिल्यांदाच खंडित झाली आहे. निवडणूक निकालानंतर काही पक्षांनी काढलेल्या विजयी मिरवणुकांमधून निळा झेंडाही लुप्त झाल्याची प्रतिक्रिया आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईच्या वेगवेगळ्या भागांत संघटितपणे राहात असलेल्या आंबेडकरी समाजाची राजकीय ताकद आहे. त्यामुळेच मुंबई महापालिकेत एक तरी रिपब्लिकन पक्षाचा नगरसेवक कायम राहिला आहे. ही निवडणूक मात्र त्याला अपवाद ठरली आहे.

मुंबई महापालिकेच्या १९५७ च्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीचा घटक पक्ष असलेल्या शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशनचे (नंतर त्याचे रिपब्लिकन पक्षात रूपांतर झाले) १८ नगरसेवक निवडून आले होते आणि १९५९ मध्ये पी.टी. बोराळे यांना एक वर्ष मुंबई महापालिकेचे महापौरपद भूषविण्याचा मान मिळाला होता, अशी माहिती आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक ज. वि. पवार यांनी दिली.  तर रिपब्लिकन पक्षाने ज्या ताकदीने भाजपला साथ दिली, त्याच प्रकारे भाजपने साथ दिली असती, तर रिपब्लिकन पक्षाचेही पाच-सहा उमेदवार निवडून आले असते, असे रिपब्लिकन पक्षाचे नेते गौतम सोनावणे यांचे म्हणणे आहे. १९९२ च्या निवडणुकीत रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाने काँग्रेसबरोबर युती केली होती, त्या वेळी रिपब्लिकन पक्षाचे १२ नगरसेवक निवडून आले होते आणि चंद्रकांत हंडोरे यांना महापौर होण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर १९९७ च्या निवडणुकीत सर्व गटांचे ऐक्य झाले. त्या वेळी स्वतंत्रपणे निवडणुका लढवूनही एकसंध रिपब्लिकन पक्षाचे चार नगरसेवक निवडून आले होते. २००२ च्या निवडणुकीच्या पक्षात पुन्हा फूट पडली तरी रिपाइंचा एक उमेदवार विजयी झाला होता. २००७ च्या निवडणुकीत आठवले यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे तीन नगरसेवक निवडून आले होते. २०१२ मध्ये रिपब्लिकन पक्षाने भाजप-शिवसेनेची युती केली होती, त्या वेळी त्यांचा एक उमेदवार निवडून आला होता. तर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील भारिप-बहुजन महासंघाचा एक उमेदवार विजयी झाला होता. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते मनोज संसारेही त्या वेळी निवडून आले होते. या वेळी आठवले यांच्या पक्षाची भाजपबरोबर युती होती. भारिप-बहुजन महासंघाने महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या नावाने स्वतंत्र निवडणुका लढविल्या. प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने काँग्रेसबरोबर हात मिळवणी करुन काही जागा लढविल्या होत्या. अर्जून डांगळे यांच्या रिपब्लिनकन जनशक्तीने शिवसेनेबरोबर समझोता केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2017 2:57 am

Web Title: republican party of india mumbai municipal corporation bmc election 2017
Next Stories
1 मुंबई महापालिकेत ९५ नगरसेवक पदवीधर
2 २०१९ मध्ये भाजपला मुंबईचे दार खुले!
3 शहरबात  : भाषिक अस्मितांचे राजकारण कुठे नेणार?
Just Now!
X