कमळाने घात केलाच; आता युती फक्त मुंबईतच

रिपब्लिकन पक्षाच्या तगडय़ा उमेदवारांना आपल्याकडे खेचून त्यांना कमळ चिन्ह देऊन निवडणुका लढविण्यास भाग पाडण्याचा भाजपचा वाटणारा धोका अखेर खरा ठरला. पुणे, पिंपरी-चिंचवड व सोलापूर महानगरपालिकेत भादपने कमळ चिन्ह देऊन रिपाइंच्या १७ उमेदवारांना निवडणुकीत उतरविले आहे. त्या सर्व पदाधिकाऱ्यांना पक्षाने निलंबित केले आहे. युचीचा धर्म पाळला नाही, अशी टीका करीत, त्या पक्षाशी फक्त मुंबईपुरतीच युती राहील, अशी घोषणा रिपब्लिकन पक्षाने केली आहे.

राज्यात या आधी झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना भाजपने उमेदवारी देऊन पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न केला, अशी टीका करीत पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर लोणावळे येथे झालेल्या पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत कमळ चिन्ह घेऊन निवडणुका लढणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता.

मुंबईसह दहा महापालिका व २५ जिल्हा परिषदांमध्ये भाजपबरोबर युती करण्याची रिपाइंने तयारी केली होती. परंतु भाजपने पुणे, पिंपरी चिंचवड व सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत रिपाइंच्याच कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले. त्याची गंभीर दखल घेऊन कमळ चिन्ह घेऊन निवडणुका लढवणाऱ्या १७ पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे प्रदेश सरचिणीस राजा सरवदे यांनी जाहीर केले. त्यात पुण्यातील १०, सोलापूरमधील ४ व पिंपरी-चिंचवडमधील ३ उमेदवारांचा समावेश आहे. पुणे शहर जिल्हा कार्यकारिणीही बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रिपब्लिकन पक्षाने आता भाजपबरोबर फक्त मुंबईतच युती राहील, अन्य ९ महापालिकांमध्ये स्वतंत्र निवडणुका लढण्याची घोषणा केली आहे. मात्र उल्हासनगरमध्ये रिपाइंने शिवसेनेशी हातमिळवणी केली आहे. मुंबईतील सहा जागांवर भाजपचे उमेदवार आहेत, त्याबाबतचा घोळ अजून मिटलेला नाही. त्यामुळे मुंबईतील रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्तेही संभ्रमात आहेत.