संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल

हिंदूत्वाचे नाव घेण्याची सरकारची लायकी नाही असा हल्लाबोल करीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘देवदेवतांच्या तसबिरी शासकीय कार्यालयांबाहेर काढा आणि सत्यनारायणाच्या पूजा बंद करा,’ असे आदेश जारी केल्याबद्दल सरकारने जनतेची माफी मागावी, अशी मागणी केली. हिंदूत्वाच्या रक्षणासाठी आता सरसंघचालक मोहन भागवत यांनीच सरकारमध्ये हस्तक्षेप करावा, असेही मत राऊत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.

मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालयांमधून देवदेवतांच्या तसबिरी, प्रतिमा बाहेर काढाव्यात, सत्यनारायण पूजा व अन्य कार्यक्रम करू नयेत, असा फतवा राज्य सरकारने जारी केला आहे. त्याविरोधात राऊत यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. हिंदूत्व आणि राममंदिर बांधण्याचे आश्वासन देऊन हे सरकार सत्तेवर आले आहे. हिंदू देवदेवतांच्या तसबिरी शासकीय कार्यालयांबाहेर काढण्याचे काम काँग्रेस सरकारच्या काळातही कधी झाले नाही.

जनजागृती आणि राष्ट्रकार्यासाठी प्रेरणा देण्यासाठी लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केला. मग आता हे सरकार हिंदू देवदेवतांच्या तसबिरी काढून टाकण्यास का सांगत आहे, असा सवाल राऊत यांनी केला. हिंदूच्या देवदेवता, गणेशोत्सव, दहीहंडी यांसारख्या सणसमारंभांवर र्निबध आणले जात आहेत आणि मुस्लीम व अन्य धर्मीयांबाबत तसे करण्याची हिंमत सरकार दाखवत नाही, हा मुद्दा निवडणुकीत तापविला जाणार आहे.

सरकार हिंमत दाखवणार काय?

मंत्रालयात, अन्य शासकीय कार्यालयांमध्ये नमाजासाठी काही जागा देण्यात आली आहे, विमानतळासह अनेक सार्वजनिक ठिकाणी नमाज पढले जातात. त्याला आम्ही कधीही आक्षेप घेतलेला नाही. पण हिंदू देवदेवतांच्या पूजाअर्चावर आक्षेप घेत तसबिरीही काढून टाकण्याचे आदेश देणारे सरकार हे नमाज थांबविण्याची हिंमत दाखविणार आहे का, अशी विचारणा राऊत यांनी केली.