20 November 2019

News Flash

युती तुटल्याचा मुंबईत काँग्रेसला फटका?

२०१४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे बदलली.

 

आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढणार असल्याने, अस्तित्वासाठी लढणाऱ्या काँग्रेसला त्याचा जास्त फटका बसणार आहे. कारण शिवसेना आणि भाजप या सत्तेतील दोन पक्षांमध्ये होणाऱ्या लढतीत काँग्रेसची पीछेहाटच होण्याची चिन्हे आहेत.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला नेहमीच संमिश्र यश मिळाले. १९९२च्या निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक काँग्रेसचे निवडून आले होते. त्यानंतर गेल्या चार निवडणुकांमध्ये काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावरच राहिला आहे. १९९९, २००४ आणि २००९च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मुंबईत काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. काँग्रेस पहिल्या क्रमांकावरील पक्ष होता. पण त्यानंतर झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये २००२, २००७ आणि २०१२ मध्ये शिवसेनेचा भगवा मुंबईवर फडकला होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मुंबईकरांनी काँग्रेसला कौल दिला असला तरी महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेनेच बाजी मारली आहे.

२०१४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे बदलली. मोदी लाटेत भाजपला यश मिळत गेले. गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत भाजपचे १५ तर शिवसेनेचे १४ आमदार निवडून आले. काँग्रेसचे फक्त पाचच आमदार निवडून आले. गेली दोन-अडीच वर्षे भाजप आणि शिवसेना या दोन मित्र पक्षांमध्येच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवरून जुंपली आहे. भाजप आणि शिवसेनेच्या वादात काँग्रेसचे अस्तित्व कायम ठेवण्याचा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी प्रयत्न केला. मुंबईतील विविध प्रश्नांवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. राज्यात काँग्रेस विरोधी पक्षाच्या मानसिकेतत अद्यापही गेलेले नाही. पण मुंबईत काँग्रेसने रस्त्यावर उतरून विविध आंदोलने केली. महानगरपालिकेतील घोटाळे किंवा गैरव्यवहारांवरून आवाज उठविला.

भाजप आणि शिवसेना या दोन सत्तेतील मित्र पक्षांमध्येच मुंबईत लढत होणार आहे.

दोन्ही पक्ष सारी ताकद पणाला लावणार हे तर ओघानेच आले. शिवसेनेसाठी करू वा मरू अशी लढाई आहे. भाजपही तेवढय़ाच तयारीने उतरणार आहे. अशा वेळी काँग्रेसला अस्तित्व टिकविणे कठीण जाईल, अशी लक्षणे आहेत.

दीड वर्षांपूर्वी झालेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत लढत झाली होती. या दोन पक्षांच्या चुरशीच्या लढाईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष पार माग पडले. याचीच पुनरावृत्ती मुंबईत होईल, असा अंदाज राजकीय निरीक्षकांकडून वर्तविला जातो. कल्याणएवढी वाईट अवस्था झाली नाही तरी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर मागे पडेल, अशी चिन्हे आहेत.

किमान संधी

काँग्रेसचा पारंपारिक मतदारही मुंबईत साथ देत नाही, असे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बघायला मिळाले. मुस्लीम मते काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि एमआयएममध्ये विभागली जातील. उत्तर भारतीयांना काँग्रेसपेक्षा भाजपचे जास्त आकर्षण आहे. मराठी मते काही प्रमाणात मिळू शकतात, पण हे प्रमाण अत्यल्पच असण्याची शक्यता आहे. नोटाबंदीचा फटका बसलेला काही प्रमाणात गुजराती समाज हा भाजपवर नाराज आहे. पण ही मते शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. काँग्रेस त्याचा फायदा उठविण्यासाठी प्रयत्नशील आहे. हे सारे प्रतिकूल मुद्दे असताना मुंबई काँग्रेसमधील भांडणे, गटबाजी हे सारेच पक्षाच्या मुळावर येऊ शकते. राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याचे शेवटच्या क्षणी प्रयत्न सुरू झाले असले तरी त्याचाही फार काही परिणाम होण्याची शक्यता नाही. शिवसेना आणि भाजप एकत्र लढले असते तर काँग्रेसचा पर्याय मतदारांपुढे होता. आता या दोन पक्षांमध्येच लढत होणार असल्याने काँग्रेसलाही ती संधीही साधता येणार नाही.

First Published on January 28, 2017 3:07 am

Web Title: sena bjp alliance break may affect on congress in mumbai corporation election
Just Now!
X