नोटाबंदी आणि अर्थसंकल्प मांडण्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मानसिकता विरोधकांसारखी असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्या नेहमीच्या तिरकस पद्धतीने उद्धव यांचे बुधवारी अप्रत्यक्षपणे कौतुकच केले. भाजपच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या शिवसेनेबद्दल कधी चांगले शब्द तर काही वेळा शब्दांचा मारा करीत उद्धव यांना उचकविण्याचा प्रयत्न पवारांकडून वारंवार होण्यामागे साहजिकच त्याला वेगळी किनार आहे. कारण शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढल्याशिवाय राष्ट्रवादीचे महत्त्व वाढणार नाही.

राज्याच्या राजकारणात वेगवेगळे राजकीय प्रयोग किंवा राजकीय डाव टाकण्यात शरद पवार हे चाणाक्ष मानले जातात. भाजपची सत्ता येताच राष्ट्रवादीने भाजपला अनुकूल भूमिका घेतली. राज्य विधानसभेचे संपूर्ण निकाल जाहीर होण्यापूर्वीच भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणाही राष्ट्रवादीने केली होती. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार तगले हा चुकीचा संदेश गेल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेबरोबर जुळवून घेतले. दोघांची गरज असल्याने राज्याच्या सत्तेत भाजप आणि शिवसेना एकत्र आहेत. पण खऱ्या अर्थाने विरोधकांची भूमिका सत्तेत असूनही शिवसेनाच बजावीत आहे. परस्परांवर कुरघोडी केल्याशिवाय उभयतांचा एक दिवसही जात नाही. अशा वेळी भाजप आणि शिवसेनेत आणखी अंतर निर्माण करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून केले जात आहेत.

भाजप आणि शिवसेनेतील वाद आणखी वाढेल यावर राष्ट्रवादीचा भर असतो. भाजप आणि शिवसेनेतील वादाचा फायदा उठविण्याचा तेवढा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात नाही. मात्र, राष्ट्रवादीकडून वादात खतपाणी घातले जाते. या वादामुळेच राज्यात मध्यावधी निवडणुकांचे भाकीत पवारांनी मागे वर्तविले होते. भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष सत्तेत किती काळ राहतात हे येणारा काळ ठरवेल, असे सांगत पवार यांनी पुन्हा एकदा दोन्ही पक्षांचे फार काळ टिकणार नाही, असे चित्र निर्माण केले आहे. सारखे भांडण्यापेक्षा सरकारमधून बाहेर पडावे, असा सल्लाही राष्ट्रवादीने यापूर्वी शिवसेनेला दिला होता.

शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडावे, असाच एकूण राष्ट्रवादीचा प्रयत्न असतो. कारण शिवसेनेने पाठिंबा काढून घेतल्यास सरकार टिकविण्याकरिता राष्ट्रवादीचा पर्याय उपलब्ध असू शकतो. यातूनच कधी सौम्य भाषेत तर कधी खास पवार शैलीत शिवसेनेवर भाजपबरोबरील संबंधांबाबत ते टीकाटिप्पणी करीत असतात. उद्धव ठाकरे यांना उचकविण्याचा प्रयत्न करून शिवसेनेने टोकाची भूमिका घ्यावी, असा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे.

आता भाजपच्या विरोधात आक्रमक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे दोघेही परस्परांवर स्तुतिसुमने उधळतात हे राज्यातील जनतेने बघितले आहे. अलीकडेच पुण्यातील सभेत हे चित्र बघायला मिळाले होते. नोटाबंदीच्या निर्णयाचे सर्वात आधी शरद पवार यांनी स्वागत केले होते. त्याच राष्ट्रवादीने आता नोटाबंदीच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. निर्णय चांगला होता, पण जनतेला त्रास होऊ लागल्याने आंदोलन करावे लागत असल्याची पवारांची त्यावर प्रतिक्रिया आहे. भाजपबरोबरील वाढत्या जवळीकीबद्दल राष्ट्रवादीला निवडणुकीत फटका बसतो हे अलीकडे नगरपालिका निवडणुकांच्या निकालांवरून स्पष्ट झाले. त्यातूनच बहुधा पवारांनी पुन्हा भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली असावी. आजच नाशिक जिल्ह्य़ात झालेल्या सभेत पवारांनी मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ‘शरद पवारांचे बोट धरून राजकारणात आलो’ हे मोदींचे वक्तव्य ऐकून थक्कच झालो, असे सांगत पवारांनी मोदींपासून अंतर राखण्याचा प्रयत्न केला. कारण आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या विरोधात भूमिका घेतल्याशिवाय राष्ट्रवादीला मते मिळणार नाहीत हे पवारांसारख्या धूर्त राजकारण्याला लक्षात आले असणार.

शरद पवार आणि अजित पवार यांच्यामुळे सहकारी साखर कारखाने डबघाईला आल्याचा मुद्दा मांडीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पवारांच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ही याचिका दाखल झाली असतानाच पवारांनी भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा काही संबंध आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भूखंडांचे श्रीखंड, गुन्हेगारीचे राजकारण आदी अनेक विषयांवर पवार लक्ष्य झाले होते. पण प्रथमच कायदेशीर लढाई लढण्याचा इशारा पवारांनी दिला आहे.