उमेदवारांची यादी जाहीर होताच बंडखोरीला उधाण

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपसोबतची युती तोडून स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या शिवसेनेतच आता पक्षांतर्गत युद्ध सुरू झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या यादीवर शिक्कामोर्तब करताच, उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. विभागप्रमुखांच्या कुटुंबीय, युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय आणि वर्षांनुवर्षे नगरसेवकपदी राहिलेल्यांनाच उमेदवारी देण्यात आल्याने पक्षातील इच्छुकांसह काही शाखाप्रमुख व कार्यकर्त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. किमान तीन ठिकाणी शिवसैनिकांनी तीन ठिकाणच्या शाखांना टाळे ठोकत आपला संतात व्यक्त केला.

गोव्यावरून मुंबईत परतलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालिका निवडणुकीत उमेदवारीबाबतच्या यादीला बुधवारी मध्यरात्रीच्या दरम्यान अंतिम रूप दिले. या वेळी शिवसेनेतील खासदार, आमदार, विभागप्रमुख आदी मंडळी उपस्थित होती. खासदारांच्या पत्नीसाठी दोन विभागप्रमुखांनी, तर विभागप्रमुखाचा पुत्र आणि अन्य एका विभागप्रमुखाला उमेदवारी देण्यासाठी खासदारांनी शब्द टाकला. एका आमदाराने विभागप्रमुखाच्या मदतीने आपल्या भावाचे नाव पुढे सरकवले होते. पालिका निवडणुकीच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विभागप्रमुखांना दुखावून चालणार नाही, ही बाब लक्षात घेत उद्धव ठाकरे यांनी या मंडळींच्या मर्जीनुसार उमेदवारी देऊन टाकली.

विभागप्रमुखांच्या माध्यमातून शिवसेनेच्या उमेदवारांना बुधवारी रात्रीपासून एबी अर्ज वाटपाचे काम सुरू करण्यात आले. आपल्या प्रभागात दिलेल्या उमेदवाराबद्दल नापसंती व्यक्त करीत अनेक शिवसैनिक रस्त्यावर उतरले. वडाळा, जिजामातानगर, आर्थर रोड परिसरात शिवसैनिकांचा प्रचंड उद्रेक झाला. संतप्त शिवसैनिकांनी शिवसेनेच्या शाखा क्रमांक १९५, १९७ आणि १९९ ला टाळे ठोकले. शिवसेना शाखा क्रमांक १९७ मधील शिवसैनिकांनी विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, आमदार सुनील शिंदे आणि नगरसेविका किशोरी पेडणेकर यांच्या कार्यालयाबाहेर निषेध करीत प्रतीकात्मक पुतळा जाळला. त्यानंतर शिवसैनिकांनी ‘मातोश्री’वर कूच केली. ‘मातोश्री’बाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली होती. अखेर शाखाप्रमुख रामकृष्ण शिंदे आणि माजी नगरसेवक परशुराम देसाई यांना ‘मातोश्री’वर बोलावून चर्चा करण्यात आली.

आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आल्याची बातमी प्रभागात पसरली आणि शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र ही केवळ चर्चा होती. या प्रभागातून आपल्याला उमेदवारी देण्यात आल्याचे परशुराम ऊर्फ छोटू देसाई यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले. किशोरी पेडणेकर यांच्या उमेदवारीला विरोध असलेल्या स्थानिक शिवसैनिकांनीही ‘मातोश्री’वर जाऊन ठिय्या आंदोलनच केले.

महापौर स्नेहल आंबेकर यांना देण्यात आलेल्या उमेदवारीवरून स्थानिक नगरसेवक प्रचंड भडकले. प्रभागाबाहेरचा उमेदवार लादू नये, अशी येथील स्थानिक शिवसैनिकांनी पहिल्यापासून मागणी केली होती. मात्र असे असतानाही महापौर स्नेहल आंबेकर यांना या प्रभागातून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे संतप्त त्यांनीही शाखा क्रमांक १९५ ला टाळे ठोकले आणि शाखेबाहेरच ठिय्या आंदोलन केले. शिवसैनिक        रस्त्यावर उतरले असताना या शाखेतील शाखाप्रमुख मात्र गायब होते. त्यांचा शोध शिवसैनिक घेत होते.युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासोबत सावलीसारखे असणारे अमेय घोले यांना वडाळ्यामधून उमेदवारी देण्यात आली आहे. या परिसरातील इच्छुक माधुरी मांजरेकर यांचे समर्थक यामुळे प्रचंड संतापले. त्यांनीही स्थानिक शाखेला टाळे ठोकले आणि अमेय घोले यांच्या उमेदवारीस कडाडून विरोध केला.

शिवसेनेचे विभागप्रमुख सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांना शिवसेनेने दादरमधून उमेदवारी दिली आहे. सदा सरवणकर यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे महेश सावंत यांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. दादरमधूनच अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा त्यांचा विचार आहे.

वरळीत शिवसैनिकांचा भाजपप्रवेश

तब्बल १५ वर्षे नगरसेवकपद आणि तीन वेळा बेस्ट समितीचे अध्यक्षपद भूषविलेल्या विभागप्रमुखांनी निवडणूक लढविण्याची इच्छा  व्यक्त करताच उमेदवारी देण्यात आल्यामुळे वरळी परिसरातील शिवसैनिकांनी प्रचंड असंतोष व्यक्त केला. यामुळे नाराज झालेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

या परिसरातील शिवसेनेचे विभागप्रमुख आशीष चेंबूरकर यापूर्वी तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तब्बल १५ वर्षे नगरसेवक असताना त्यांनी तीन वेळा बेस्ट समितीचे अध्यक्षपद भूषविले होते. बेस्ट समितीच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णयही घेतले होते. त्यानंतर एक वेळा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली होती. मात्र त्या वेळी त्यांना पराभव पत्कराला लागला होता. आता मोठय़ा विश्वासाने ‘मातोश्री’ने त्यांच्यावर विभागप्रमुखपदाची धुरा दिली होती. आपल्या विभागांमधील प्रभागांमधून इच्छुक असलेल्यांची यादी विभागप्रमुखांमार्फत मागविली जाते. त्यानंतर यादीतील इच्छुकांच्या वरिष्ठ नेत्यांमार्फत भेटीगाठी घेतल्यानंतर उमेदवारी निश्चिती केली जाते. या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी विभागप्रमुखांवर सोपविण्यात येते. मात्र आशीष चेंबूरकर यांनी स्वत:च निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांना उमेदवारीही देऊन टाकली.

चेंबूरकर निवडणुकीमध्ये व्यस्त राहणार असल्यामुळे या विभागातील अन्य प्रभागांमधील उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच विभागप्रमुखांनी स्वत:साठी उमेदवारी मिळविल्याने या परिसरातील शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यामुळे वरळीमधील शाखाप्रमुख जिवबा केसरकर यांनी गुरुवारी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. केसरकर यांच्यासोबत या परिसरातील आठ उपशाखाप्रमुख, पाच महिला उपशाखाप्रमुख, २६ महिला व पुरुष गटनेते आणि अनेक शिवसैनिक भाजपमध्ये दाखल झाले.