युतीचा पेच कायम असतानाच शिवसेनेचा निवडणूक मेळावा (आज) २६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता गोरेगावच्या नेस्को संकुलात होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शन करणार असून ते या मेळाव्यातच युतीचा फैसला जाहीर करणार आहेत. त्यामुळे ठाकरे कोणती भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
मुंबई-ठाण्यासह १० महानगरपालिका, २५ जिल्हा परिषदा आणि २८५ पंचायत समित्यांच्या निवडणुका फेब्रुवारीत होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने मेळाव्याचे आयोजन केले असून युतीविषयी आपली भूमिका मांडण्यात येणार आहे.
मुंबईतील गटप्रमुख, विभागप्रमुख, राज्याच्या कानाकोपऱ्यातील शाखाप्रमुखांपासून जिल्हाप्रमुखांपर्यंत आणि शिवसेना नेते, उपनेते, मंत्री, आमदार-खासदार आणि आजी-माजी पदाधिकारी यांना मेळाव्यास उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
या मेळाव्यात शिवसेनेच्या नवीन निवडणूक गीताच्या ध्वनिचित्रफितीचेही प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे या मेळाव्यातून उद्धव ठाकरे शिवसैनिकांना कोणता संदेश देतात, युतीबाबत काय भूमिका मांडतात, कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.