शिवसेनेशी पारदर्शक कारभाराच्या आधारावरच युती केली जाईल, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून खरपूस समाचार घेण्यात आला आहे. बीएसएफ जवान तेजबहादूर यादव याच्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओचा दाखला देत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातून भाजपला खोचकपणे टोले लगावण्यात आले आहेत. पारदर्शक कारभाराची भाषा करणारे जवानांच्या आक्रोशाला वेडे ठरवतात, असे सांगत सेनेने पुन्हा एकदा केंद्राच्या कारभारावर निशाणा साधला. कारभारात पारदर्शकता हवी असे आता राज्यकर्त्यांतर्फे ऊठसूट सांगितले जाते, पण पारदर्शक कारभार कसा याचे प्रात्यक्षिक त्या वेडय़ा ठरवण्यात आलेल्या जवानाने दाखवले. जळून खाक झालेली व जळून भोके पडलेली रोटी त्या जवानास खावी लागते. ही पारदर्शकताच आहे. डाळीचा पत्ता नसलेले पिवळे पाणी व त्यातून दिसणारा वाटीचा तळ हे तर पारदर्शक व ‘स्वच्छ’ कारभाराचेच लक्षण मानावे लागेल, अशी खोचक टीका सेनेने केली आहे. तसेच जवान वेडे, आत्महत्या करणारे शेतकरी ठार वेडे, ‘नोटाबंदी’सारख्या विषयावर परखड सत्य मांडणारे देशद्रोही; मग या देशात शहाणे कोण? , असा सवालही सेनेने उपस्थित केला आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या भाजप कार्यसमितीच्या बैठकीत आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेशी युती करायची झाल्यास ती पारदर्शक कारभाराच्या आधारावरच केली जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. युती केली तर ती केवळ जागांची तडजोड असणार नाही. पारदर्शी कारभार आणि विकासाच्या वाटेने परिवर्तन होणार असेल, तरच युती होईल, असे ठणकावत फडणवीस यांनी भाजपला गृहीत धरू नका, असाच इशाराच सेनेला दिला होता. लढण्याचा आदेश आल्यावर समोर कोण आहे ते न पाहता शिवरायांच्या मावळ्यांप्रमाणे तुटून पडा, असे आवाहनही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले होते. याशिवाय, भाजपकडून आगामी निवडणुकांसाठी स्वतंत्रपणे बनविण्यात आलेल्या जाहीरनाम्यातही ‘पारदर्शक’ हे विशेषण चिकटवत सेनेला डिवचण्याचा प्रयत्न झाला होता.