‘आयात’ उमेदवारांवर भिस्त; खेळीने काँग्रेस सावध

सहामजली झोपडय़ांसाठी प्रसिद्ध असलेल्या वांद्रे पूर्वच्या मुस्लिमबहुल बेहरामपाडय़ात कायमच काँग्रेसचा वरचष्मा राहिला असताना शिवसेनेने एमआयएमकडून आयात केलेल्या उमेदवाराला तिकीट देऊन या विभागात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला आहे. सेनेच्या या खेळीला तूर्तास प्रतिसाद मिळत असून काँग्रेस, सपा व एमआयएमच्या उमेदवारांसह कधी नव्हे ते शिवसेनेचीही चर्चा या विभागात सुरू आहे.

समोरून येणाऱ्याला वाट देण्यासाठी भिंतीला टेकावे लागते अशा गल्ल्यागल्ल्यांमध्ये सध्या काँग्रेसचा पंजा, राष्ट्रवादीचे घडय़ाळ, सपाच्या  सायकलचे झेंडे आणि पताके नजरेस पडत आहेत. पूर्वी सुनिल दत्त आणि त्यानंतर प्रिया दत्त यांनी बांधलेल्या या मतदारसंघाने अनेक वर्षे काँग्रेसला हात दिला. आधीच्या वांद्रे टर्मिनस आणि निर्मल नगर या प्रभागात डॉ. प्रियतमा सावंत व खेरवाडी, बेहरामपाडा या दुसऱ्या प्रभागात गुलिस्ता शेख नगरसेवक होत्या. या दोन्ही प्रभागांमध्ये वांद्रे स्थानकालगतच्या झोपडपट्टीखेरीज मध्यमवर्गीय वस्तीही होती. त्यामुळे मुस्लिमेतर मतांचाही प्रभाव पडत होता. मात्र नव्या प्रभागरचनेत वांद्रे टर्मिनस, बेहरामपाडा, गरीब नगर, वांद्रे कोर्ट असा सर्व परिसर एकाच ९६ क्रमांकाच्या प्रभागात ठेवला गेला. गेल्या काही निवडणुकांच्या आकडेवारीनुसार या प्रभागात यावेळी काँग्रेस, सपा आणि एमआयएम यांची लढत पाहायला मिळण्याचा अंदाज होता. मात्र या प्रभागात फेरी मारल्यावर काँग्रेस आणि एमआयएमसोबत शिवसेनेचेही नाव ऐकू येत आहे.

गेल्या पालिका निवडणुकीतही ही जागा काँग्रेसकडेच राहिली. मात्र दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत येथे एमआयएमने १५ हजार मते खिशात घालून खळबळ उडवून दिली होती. काँग्रेसने विद्यमान नगरसेविका गुलिस्ता शेख यांच्याऐवजी कादरी शरीफ यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे गुलिस्ता शेख या अपक्ष म्हणून उभ्या राहिल्या आहेत. सपकडून शकील शेख तर एमआयएमकडून शाहीद शेख उभे आहेत. एमआयएमकडून तिकीट मिळाले नसल्याने हाजी हलीम खान यांनी सेनेतून तिकीट मिळवले. एमआयएमसोबत काम केल्याने त्यांना लोक ओळखतात, त्याचा सेनेला फायदा होत आहे, असे मत या परिसरातील एकाने नोंदवले.

या भागात भाजप व शिवसेना कधीच नव्हती. मात्र पालिका निवडणुकीत लोक उमेदवाराकडे पाहून मत देतात. शिवसेनेने इथे ओळख असलेल्या माणसाला उमेदवारी दिली आहे, असे स्नेहा सागरच्या नुरी शेख म्हणाल्या. या परिसरात २५ हजार मतदार आहेत. देशाच्या विविध भागातून आलेल्या रहिवाशांचे मूळ ठिकाणावरून गट आहेत व कोणता उमेदवार हा अधिक चांगले काम करू शकतो, याच्या एकत्र येऊन चर्चा होतात, असे याद ए हुसेन समितीच्या दिलवार सत्तार यांनी सांगितले. सध्या इथे काँग्रेस व सेना यांच्या उमेदवारांची हवा आहे.