स्थानिक उमेदवारांना डावलल्याने शाखेला टाळे; उमेदवार बदलाची घोषणा

बंडखोरी, नाराजी, उद्रेक टाळण्यासाठी मध्यरात्री उमेदवारांची यादी जाहीर करण्याची खेळी पक्षश्रेष्ठींनी खेळूनही राजकीय पक्षांना कार्यकर्त्यांमध्ये उफाळून आलेली असंतोषाची लाट थोपविता आली नाही. गुरूवारी याचे सर्वाधिक पडसाद शिवसेनेत उमटले. अनेक प्रभागांमधून शिवसैनिकांनी स्थानिक उमेदवारांना डावलल्यामुळे शाखेला टाळे ठोकले. तर काही ठिकाणी मोर्चा, घोषणाबाजी करून असंतोषाला वाट करून देण्यात आली. १९७ प्रभागात तर आधी दिलेला उमेदवार बदलून चक्क नव्या नावाची घोषणा शिवसेनेला करावी लागली.

पांचाळ यांच्या विरोधात निदर्शने

परळमध्येही शिवसनिकांनी उमेदवारी मिळालेल्या उर्मिला पांचाळ यांच्या विरोधात निदर्शने केली. परळ विभागातील २०० क्रमांकाचा प्रभाग हा महिलांसाठी राखीव झाला होता. या प्रभागात आपल्या पत्नीला यांना उमेदवारी मिळावी म्हणून नाना आंबोले आग्रही होते. नाना आंबोले हे लालबाग-परळ विभागातील शिवसेनेचा प्रमुख चेहरा मानले जातात. मात्र बेस्ट समितीवरून पायउतार करायला लागल्यानंतर ते पक्षात फारसे सक्रिय नव्हते. शिवाय आपल्या पत्नीला उमेदवारी न मिळाल्याने तेजस्विनी आंबोले यांनी काल सेनेला रामराम ठोकत भाजपच्या गोटात प्रवेश केला. त्यामुळे नाराज झालेल्या सेना कार्यकर्त्यांनीही उर्मिला पांचाळ यांच्या विरोधात निदर्शने केली.

कुटुंब कलह भोवला?

१७८ प्रभागात जाळपोळ, निदर्शने, मोच्रे काढत शिवसैनिकांनी गुरूवारचा दिवस गाजवला. वडाळा विभागातील १७८ प्रभागात युवा सेना कार्यकत्रे अमेय घोले यांना उमेदवारी दिल्याने येथील इच्छुक माधुरी मांजरेकर यांच्या समर्थकांनी प्रचंड गोंधळ घातला. कार्यकर्त्यांनी शाखेला टाळे ठोकून ‘अमेय घोले चोर है’चे नारे लगावले. घोले यांच्या नावाला स्थानिक शिवसनिकांचा विरोध असल्याचे वृत्त लोकसत्ता ने दिले होते.

घोले हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. शिवाय त्यांचे वडील अरुण घोले हे विभागातील बडे प्रस्थ आहेत.

१९९३ साली त्यांनी शिवसेनेकडून पालिका निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना हार पत्कारावी लागली होती. विभागप्रमुखांच्या मधल्या फळीवर दबाव टाकून घोले यांनी उमेदवारी मिळवल्याचा आरोप आंदोलनकर्त्यां शिवसनिकांनी केला आहे.

माधुरी मांजरेकर यांनी गेली काही वष्रे विभागात कामे केल्याने त्यांच्या नावाला या भागातून पाठिंबा होता.

पालिका सभागृहातील एका वरिष्ठ महिला नेत्याचे माधुरी मांजरेकर यांच्याशी कौटुंबिक सबंध असूनही त्यांनी मांजरेकर यांना उमेदवारी मिळण्याबाबत प्रयत्न का केले नाही, असाही प्रश्न विभागात चíचला जात आहे.

‘माझा विरोध हा पक्षश्रेष्ठींना नसून ज्या मधल्या फळीतील नेत्यांनी माझा आवाज ’मातोश्री’ पर्यत पोहचवला नाही त्यांना आहे,’ असे मांजरेकर यांनी लोकसत्ता-मुंबईशी बोलताना सांगितले.

किशोर पेडणेकर यांना विरोध

या प्रभागातून आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी यासाठी शिवसेना शाखा क्रमांक १९९ मधील शाखाप्रमुख राजेश पुसळे उच्छुक होते.

तसेच या विभागातील महिला शाखाप्रमुख लक्ष्मी सावंतही निवडणूक लढविण्यास इच्छुक होत्या. परंतु या दोघांच्याही नावाचा विचार न करता विद्यमान नगरसेविका किशोरी पेडणेकर यांना या प्रभागातून उमेदवारी देण्यात आली. हे कळताच या विभागातील शिवसैनिकांनीही तीव्र नाराजी व्यक्त करीत घोषणाबाजी केली. शाखा क्रमांक १९९ ला टाळे ठोकून शिवसैनिक ‘मातोश्री’बाहेर जमा झाले. बराच वेळ शिवसैनिक तेथेच थांबले होते. काही काळ वातावरणात प्रचंड तणाव पसरला होता. त्यामुळे पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते.

महापौरांच्या विरोधात काम करणार नाही

या प्रभागामध्ये बाहेरचा उमेदवार देऊ नये असा आग्रह स्थानिक शिवसैनिकांनी सुरुवातीपासूनच धरला होता. परंतु स्थानिक शिवसैनिकांचे म्हणणे ‘मातोश्री’वर पोहोचविण्यातच आले नाही. त्यामुळे आपण दिलेला उमेदवार शिवसैनिक मान्य करणार असे गृहीत धरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रभागातून महापौर स्नेहल आंबेकर यांना उमेदवारी दिली. महापौर पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर स्नेहल आंबेकर यांच्या एकूणच कारभाराबाबत शिवसैनिक नाराज आहेत. त्याचे पडसादही या प्रभागातील शिवसैनिकांमध्ये गुरुवारी उमटले. स्थानिक पातळीवरील कोणत्याही शिवसैनिकाला उमेदवारी द्यावी, त्याला विजयी करण्यासाठी जीवाचे रान केले जाईल. पण प्रभागाबाहेरच्या स्नेहल आंबेकर यांच्यासाठी आपण काम करणार नाही, असा निश्चिय स्थानिक शिवसैनिकांनी केला आहे. महापौरांना दिलेल्या उमेदवारीच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी शाखा क्रमांक १९५ च्या बाहेर गुरुवारी ठिय्या दिला होता.

उमेदवारी बदलली

१९७ प्रभागामधून शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि या विभागातील शिवसैनिक शाखा क्रमांक १९७ जवळ जमले. शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करुन हा परिसर दणाणून सोडला. संतप्त शिवसैनिकांनी शाखेला टाळे ठोकले आणि थेट ‘मातोश्री’ गाठली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांसोबत आलेल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि अखेर परशुराम उर्फ छोटू देसाई यांना या प्रभागातून उमेदवारी देत असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर शिवसैनिकांचा संताप निवळला आणि ते माघारी फिरले.