निष्ठावंत नाराज; बंडखोरांची मोर्चेबांधणी

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील घराणेशाहीवर आवेशाने टीका करणाऱ्या भाजप-शिवसेनेमध्ये व काँग्रेसमध्ये नातेवाईक, जिवलग आणि पत्नी-मुलांना उमेदवारी देण्यासाठी अहमहमिका लागली आहे. त्यामुळे पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना पाडण्याची रणनीती सुरू झाली असून त्याचा फटका या पक्षांना निवडणुकीत बसण्याची चिन्हे आहेत.

खासदार किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या यांना मुलुंडमधून तर आमदार अमित साटम यांचे मेहुणे रोहित राठोड यांना अंधेरीतून उमेदवारी देण्यात आली आहे. राठोड हे गेली पाच वर्षे भाजप व युवा मोर्चाशी संलग्न असून जुहू-वर्सोवा परिसरात त्यांचे काम आहे. नातेवाईक असल्याने त्यांना उमेदवारी दिलेली नसून सर्वेक्षण, संसदीय मंडळाच्या बैठकीत त्यांची निवड झाली आहे, असे साटम यांनी सांगितले.

राज्यमंत्री विद्या ठाकूर यांचे चिरंजीव दीपक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष आमदार राज पुरोहीत यांचे पुत्र आकाश यांनाही उमेदवारी दिली आहे. विलेपार्ले येथील आमदार पराग अळवणी यांच्या पत्नी ज्योती यांना उमेदवारी दिली जाणार असून अंतिम निर्णय मुख्यमंत्रीघेतील. लालबाग-परळमध्ये काम करीत असलेले शिवसेना नेते नाना अंबोले यांचा प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांनी पत्नीसाठी उमेदवारी मागितली. मात्र शिवसेनेने ती नाकारल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते धनंजय पिसाळ यांची पत्नी भारती पिसाळ, तर नगरसेवक चंदन शर्मा यांची पत्नी चारुशीला यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची बहीण सईदा खान तर भाऊ कप्तान मलिक उमेदवार आहेत.

सेनेतील घराणेशाही

नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची पत्नी तेजस्विनी घोसाळकर, माजी विभागप्रमुख आणि नगरसेवक अरविंद दुधवडकर यांची पत्नी अरुंधती दुधवडकर, नगरसेवक उदेश पाटेकर यांची पत्नी सुजाता पाटेकर, विभागप्रमुख सदा सरवणकर यांचा पुत्र समाधान सरवणकर, खासदार राहुल शेवाळे यांची पत्नी कामिनी शेवाळे, विभागप्रमुख प्रकाश कारकर यांचा पुत्र हर्षल कारकर, माजी नगरसेवक भास्कर खुरसुंगे यांची पत्नी रिद्धी खुरसुंगे.

नात्यातल्यांना ‘हात’

माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांची पत्नी संगीता हांडोरे, नगरसेवक शिवा शेट्टी यांची बहीण विजयालक्ष्मी नारायण शेट्टी, काँग्रेस नेते विवेकानंद जाजू यांची पत्नी स्नेहल जाजू, काँग्रेस पदाधिकाऱ्याची बहीण देवता पाटील, ब्लॉक अध्यक्षाची वहिनी वैशाली कांबळे, लॉक अध्यक्षांची पत्नी शबनम खान, ब्लॉक अध्यक्षांची पत्नी हर्षांली कांबळे