मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्सुकता लागून राहिलेली शिवसेना आणि भाजप नेत्यांमधील सोमवारची बैठक केवळ फुसका बारच ठरला. ही बैठक जागावाटपाच्या कोणत्याही चर्चेशिवाय पार पडली. आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांतील जागावाटपाच्यादृष्टीने या बैठकीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. मात्र, सरतेशेवटी या बैठकीतूनच काहीच निष्पन्न झाले नाही. बैठकीत केवळ प्राथमिक स्वरूपाची आणि पारदर्शक कारभारासंबंधीच चर्चा झाली. याशिवाय, आगामी निवडणुकांना कशाप्रकारे सामोरे जायचे याबाबतही नेत्यांमध्ये विचारविनिमय झाला. मात्र, काही प्रमुख मुद्द्यांवर वरिष्ठ पातळीवर म्हणजेच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती बैठकीनंतर सेनेचे खासदार अनिल देसाई यांनी दिली. आता उद्या संध्याकाळी पुन्हा एकदा चर्चेची दुसरी फेरी रंगणार आहे. तसेच युती करायची की नाही, हा निर्णय घेण्यासाठी २१ जानेवारीची डेडलाईन निश्चित करण्यात आल्याचेही समजते. बी-७ या शासकीय निवासस्थानी सोमवारी संध्याकाळी आयोजित करण्यात आलेल्या या चर्चेला शिवसेनेकडून अनिल देसाई, अनिल परब व रवींद्र मिर्लेकर यांची तर, भाजपकडून दानवे, तावडे, शेलार व प्रकाश मेहता उपस्थित होते. बैठकीपूर्वी भाजप सेनेसमोर ११५ जागांचा प्रस्ताव ठेवणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे यावर शिवसेना काय प्रतिक्रिया देणार, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता होती.

दरम्यान, दुसरीकडे सोमवारी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होणार नसल्याचे काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली असून अन्य समविचारी पक्षांशी आघाडी करण्यास तयार असल्याचे काँग्रेसने सांगितले. मुंबईत सोमवारी टिळक भवनमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अन्य ज्येष्ठ नेते उपस्थित होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीसोबत आघाडी करायची की नाही याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. आघाडीबाबत चर्चा करण्यापूर्वीच राष्ट्रवादीने उमेदवारांची यादी जाहीर केल्याने काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. सविस्तर चर्चा केल्यानंतर मुंबईत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईत आघाडी झाली नसली तरी राज्यातील अन्य भागांमधून स्थानिक नेत्यांकडून प्रस्ताव आल्यास राष्ट्रवादीसोबत आघाडी करु असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

महापालिका निवडणुकीत आघाडी होणार नसली तरी विधान परिषद निवडणुकीसाठी आघाडी कायम असल्याचे त्यांनी सांगितले. अमरावती, नाशिक, नागपूर, कोकण, औरंगाबाद या भागातून विधान परिषद निवडणूक होणार आहे. समविचारी पक्षासोबत आघाडी करु असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. शिवसेना, एमआयएम आणि भाजपसारख्या जातीयवादी पक्षांसोबत आघाडी करणार नाही. एमआयएम हा पक्ष सध्या भाजपसाठी कंत्राटावर काम करत असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली.