News Flash

लालबाग-परळमध्ये शिवसेनेला मोठा धक्का; नाना आंबोले यांचा भाजपमध्ये प्रवेश

शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील सेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या परळमधील विद्यमान नगरसेवक नाना आंबोले यांनी गुरुवारी दुपारी भाजपमध्ये प्रवेश केला. लालबाग-परळ हा परिसर शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. नाना आंबोले सेनेच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक असल्याने लालबाग आणि परळमध्ये त्यांची मोठी ताकद आहे. ते सेनेच्या तिकीटावर दोनवेळा महानगरपालिकेवर निवडून गेले आहेत. त्यांनी बेस्ट समितीचे अध्यक्षपदही भुषविले होते. यंदाच्या निवडणुकीत त्यांचा वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाला होता. त्यामुळे नाना आंबोले यांनी त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याचा आग्रह धरला होता. परंतु स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी या जागेसाठी पक्षातील एका महिला पदाधिकाऱ्यांचे नाव पुढे केल्याने आंबोले संतप्त झाले होते. त्यासाठी बुधवारी रात्री एबी फॉर्मचे वाटप सुरु असताना नाना आंबोले मातोश्रीवर जाऊन आल्याचेही सांगितले जाते. मात्र, त्यांच्या पत्नीला उमेदवार मिळण्याची शक्यता मावळल्याने नाना आंबोले यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. आज दुपारी मुख्यमंत्री आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी गोवंडीचे शिवसेनेचे नगरसेवक दिनेश पांचाळ  नगरसेवकही भाजपमध्ये जाणार आहेत. दरम्यान, भाजपकडून नाना आंबोले आणि त्यांची पत्नी या दोघांनाही उमेदवारी देण्यात येणार आहे. भाजपच्या या खेळीमुळे यंदाच्या निवडणुकीत सेनेच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लागण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या नगरपालिका निवडणुकांच्यावेळी भाजपकडून विरोधी पक्षांतील सक्षम उमेदवारांना गळाला लावण्यात आले होते. आता मुंबईतही भाजपकडून याच पद्धतीचा अवलंब होताना दिसत आहे.

दरम्यान, शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी तयार करण्यात आली असून बुधवारी रात्री तब्बल १५० उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आल्याचे समजते. या पहिल्या यादीत वाद नसलेल्या जागांचा समावेश आहे. मात्र, शिवसेनेकडून अद्यापपर्यंत ही यादी अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली नाही. ३ फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. कालपर्यंत मुंबईत फक्त १६६ उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यामुळे आज आणि उद्याचा असे दोनच दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांची लगबग सुरु आहे. दरम्यान, शिवसेनेकडून पहिल्या यादीत अभिषेक घोसाळकर यांची पत्नी तेजस्विनी घोसाळकर, शीतल म्हात्रे, दीपा पाटील , मनसेतून सेनेत प्रवेश केलेले चेतन कदम यांची पत्नी भारती कदम , किशोरी पेडणेकर , देवेंद्र आंबेरकर, तृष्णा विश्वासराव, विशाखा राऊत यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 1:04 pm

Web Title: shivsena leader in nana ambole join bjp mumbai bmc election
Next Stories
1 भाजपच्या पहिल्या यादीत नील सोमय्या, अवकाश पुरोहित यांच्यासह ७२ जणांचा समावेश
2 शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर; १५० उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप
3 शुभा राऊळ यांचा निवडणूक न लढण्याचा निर्णय; वॉर्ड क्र. ८ मधून कोणाला उमेदवारी ?
Just Now!
X