शिवसेनेचे मंत्री आज रात्री दहा वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी भेट घेणार आहेत, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या संभाव्य भेटीचे कारण गुलदस्त्यात असले तरी, महापालिका निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेना युती तुटल्यानंतर शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू असल्याने या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे, असे बोलले जात आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री रामदास कदम, राज्यमंत्री दीपक केसरकर, परिवहन मंत्री दिवाकर रावते हे शिवसेनेचे मंत्री आज रात्री १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ या निवासस्थानी भेट घेणार असल्याचे सूत्रांकडून समजते. महापालिका निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेना युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांत आणि मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील शाब्दिक चकमकीमुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

महापालिका निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेमध्ये युतीच्या चर्चेच्या जोरबैठका झाल्यानंतर अखेर उद्धव ठाकरे यांनी युती तोडत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर राज्य सरकारमध्ये सत्तेत असलेले भाजप-शिवसेना महापालिका निवडणुकांमध्ये मात्र एकमेकांचे सख्खे वैरी झाल्याचे चित्र आहे. दोन्हीही पक्ष आता एकमेकांवर उघडपणे टीका, आरोप-प्रत्यारोप करत आहेत. महापालिका निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असून, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक चकमक उडत आहे. आव्हानाला प्रतिआव्हानाने उत्तर देण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे. त्यात मध्यंतरी शिवसेनेचे मंत्री हे राजीनामे खिशात घेऊन फिरतात, असे वक्तव्य मंत्र्यांनीच केले होते. त्यामुळे शिवसेना आता सत्तेतून बाहेर पडेल, अशी जोरदार चर्चा रंगली आहे. त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारमधून बाहेर पडण्याबाबत पत्रकारांनी विचारले असता, हे राज्य सरकार नोटीस पिरियडवर आहे, असे वक्तव्य करून या चर्चेला एकप्रकारे बळकटीच दिली होती. त्यात आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनीही नोटीस पिरियड कोणत्याही क्षणी संपेल असे वक्तव्य करून राज्य सरकारमधून शिवसेना बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या होणाऱ्या संभाव्य भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.