मुंबई महापालिकेतील पारदर्शी आणि स्वच्छ कारभारावरुन शिवसेनेने भाजपला टोमणा लगावला आहे. पारदर्शी कारभाराचा कोंबडा भाजपने कितीही झाकायचा प्रयत्न केला तरी सूर्य उगवला आहे. आम्ही पारदर्शक आहोत पण तुम्ही आहात का असा सवालच शिवसेनेने भाजपला विचारला आहे. बोबड्या माफियांवर अंगठा चोखत बसण्याची वेळ आली अशा शब्दात सेनेने किरीट सोमय्या यांचे नाव न घेता भाजपला चिमटा काढला आहे.

केंद्र सरकारच्या आर्थिक सर्वेक्षणात मुंबई महापालिकेतील कारभार स्वच्छ आणि पारदर्शक असल्याचे म्हटले होते. यावरुन शिवसेनेने भाजपचा सामनाच्या अग्रलेखातून समाचार घेतला आहे. राज्यातील भाजप सरकारने पारदर्शकतेच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर आरोप केले. पण त्यांच्याच केंद्र सरकारने त्यांना माती खायला लावली. भाजपला जास्त जागांची हाव होती, पारदर्शकता हा फक्त एक बनाव होता हे यातून स्पष्ट झाल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून विशेष मदत नसतानाही देशातील २१ महापालिकांमध्ये मुंबईने पहिला क्रमांक गाठला. यामुळे बोबड्या माफियांवर अंगठा चोखत बसण्याची वेळ आली अशा शब्दात सेनेने भाजपला चिमटा काढला आहे.

मुंबई महापालिकेतील पारदर्शकतेवरुन टीका करणा-या भाजपवर त्यांच्या ताब्यातील महापालिकावरुन शिवसेनेने लक्ष्य केले आहे. चंदीगड, दिल्ली, भोपाळ या महापालिका भाजपच्या ताब्यात आहे. पण मुंबईच्या तुलनेत त्या पारदर्शकतेच्या बाबतीत मागे आहेत. मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला अर्थात नागपूर महापालिकाही भाजपकडेच आहे. मग भाजप नेत्यांना अभिप्रेत असलेली पारदर्शकता या महापालिकांमध्ये का नाही असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे. पारदर्शी कारभाराचा कोंबडा भाजपवाल्यांनी कितीही झाकायचा प्रयत्न केला तरी सूर्य उगवला आहे. कोंबडाही फितूर नाही व सूर्यही झाकोळणार नाही. आम्ही पारदर्शक आहोत, तुम्ही आहात काय? असा सवाल शिवसेनेने भाजपला विचारला आहे.