आधुनिक युद्ध थेट आमने-सामने नाही तर राजकीय, सामाजिक पातळीवर अप्रत्यक्ष लढली जातात. आशियातील सर्वात श्रीमंत पालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी होत असलेल्या निवडणुका या युद्धापेक्षा कमी नाहीत आणि त्यासाठी रणांगणात उतरण्याआधी अप्रत्यक्षरीत्या विरोधकाला नामोहरम करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. या ऑनलाइन ‘वॉर’साठी व्यावसायिकांनी कुमक पुरवली असून नगरसेवकपदाच्या निवडणुकांचे वैशिष्टय़ असलेल्या वैयक्तिक संवादावर भर देण्यासाठी उमेदवारांनी पावले उचलली आहेत.

युवासेने आदित्य ठाकरे यांनी मरिन लाइन्सवरील बदललेल्या पांढऱ्या दिव्यांवर ट्विटरवर टिप्पणी केली आणि ती वार्ता वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर ठाकरे यांच्या फॉलोअर्समध्येही प्रचंड वाढ झाली. सामाजिक माध्यमांची ही ताकद नंतर आदित्य ठाकरे यांनी अनेकदा वापरली. पुढच्या महिन्यात होत असलेल्या पालिका निवडणुकांमध्येही त्यांच्याच नेतृत्वाखाली सेनेची वॉररूम कामाला लागली आहे.

‘डीड यू नो’ हा पहिला वार सेनेच्या अंगलट आल्यासारखा वाटला तरी त्याची जोरदार चर्चा झाली हेदेखील नाकारता येणार नाही. पालिकेच्या सत्तापदावरून केलेल्या कामाची जाहिरात करतानाच सत्तेतील भागीदारावर अप्रत्यक्ष टीका करण्यासाठीही सेनेने सामाजिक माध्यमांचा खुबीने वापर केला आहे. नगरसेवक पक्ष सोडून चालल्याने मरगळ आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही वॉररूमच्या माध्यमातून पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न केला. दादर येथे उभारलेल्या वॉररूममध्ये फेसबुकवर एमएनएस बडी व वज्रमूठ ही अकाऊंट सुरू करण्यात आली आहेत. ट्विटर, इन्स्टाग्राम, यूटय़ूबवर रोज किमान एक ते दोन व्हिडीओ अपलोड केले जातात. याशिवाय मेसेज पाठवणे, प्रतिसाद देणे, हॅशटॅग ट्रेण्डमध्ये ठेवण्याचे काम सुरू असते. वॉररूममध्ये चाललेल्या प्रक्रियेबाबत मात्र सर्वच पक्षांनी गुप्तता पाळली आहे.

रईस शेख यांचे ४० व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप

गोवंडीऐवजी भायखळामधून निवडणूक लढवत असलेल्या समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनीही फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपद्वारे प्रचार सुरू केला. फेसबुक लाइव्हला चांगला प्रतिसाद मिळाला असून आता ४० व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून आम्ही मतदारांपर्यंत पोहोचत आहोत, असे त्यांनी सांगितले.

छेडा यांचा फेसबुकवर संवाद

एकीकडे प्रचारमोहीम सुरू करतानाच अंतर्गत दुफळीमुळे चर्चेत आलेल्या काँग्रेस पक्षाचे नगरसेवक ऑनलाइन माध्यमांकडे वळले आहेत. उमेदवारी मिळण्याची खात्री असल्याने पालिकेतील विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी याबाबत आघाडी घेतली आहे. सामाजिक माध्यम हे मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी माध्यम आहे. दर आठवडय़ाला मी एका विषयावर फेसबुकवरून ऑनलाइन संवाद साधतो. सामाजिक माध्यमे म्हणजे प्रचाराचा एक भाग आहे, असे छेडा यांनी सांगितले.

आंबेरकरांचेही नवे तंत्र

छेडा यांच्यापूर्वी विरोधी पक्षनेतेपदी राहिलेले देवेंद्र आंबेरकर यांना सामाजिक माध्यमांची फारशी माहिती नाही, मात्र प्रचाराचे बदलते तंत्र वापरायला हवे, असे त्यांना वाटते.

नगरसेवकांचे अ‍ॅप्स

ऑनलाइन मीडियासोबतच उमेदवारांचे स्वत:चे विशेष अ‍ॅप्स करण्याची योजनाही काही व्यावसायिकांनी दिली आहे. पंतप्रधानांच्या अ‍ॅप्सप्रमाणेच हे अ‍ॅप्स आहे. या अ‍ॅपवर उमेदवाराकडून संदेश, छायाचित्र, व्हिडीओ अपलोड केले जातात. हे अ‍ॅप त्याचे कार्यकर्ते, समर्थक, मित्र अशा साधारण २५० जणांनी डाऊनलोड करावे, अशी योजना असते. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तसेच सामाजिक माध्यमांद्वारे पुढील किमान २००० जणांपर्यंत हा संदेश पोहोचवला तरी एकाच वेळी पाच लाखांपर्यंत पोहोचता येतो, असे न्यूजदूतचे दिनेश कांजी यांनी सांगितले.